सुयोग्य जीवनशैली: निरोगी आरोग्यासाठी ABCDEFGH सूत्र | डॉ. ह.वि. सरदेसाई

जीवनशैली सुयोग्य सहज: निरोगी आरोग्याकडे नेणारा राजमार्ग

Author:

Prof. Kali Chandrakant

M.Sc., M.Ed., D.C.S.

50+ Years of experience in Physics teaching

 1. प्रस्तावना:

      सुमारे २०–२५ वर्षांपूर्वी सातारा येथील शाहू कलामंदिरात एका हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त पुण्याचे सुप्रसिद्ध डॉ. ह.वि. सरदेसाई यांचे आरोग्य जीवनशैली या विषयावर व्याख्यान झाले होते. सभागृह पूर्ण भरले होते आणि तब्बल तीन तास चाललेल्या त्या व्याख्यानात श्रोते मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते. मी स्वतः त्या व्याख्यानाला उपस्थित होतो.

     डॉ. सरदेसाईंनी अत्यंत साध्या, सरळ आणि शास्त्राधारित शैलीत आरोग्याचे मर्म उलगडून सांगितले. कोरोनासारख्या महामारीनंतरच्या काळातही त्यांचे विचार तितकेच उपयुक्त, कालातीत आणि मार्गदर्शक ठरतात. योग्य, संतुलित व शिस्तबद्ध जीवनशैली अंगीकारली तर कोणत्याही आरोग्यसंकटाला आपण अधिक सक्षमपणे सामोरे जाऊ शकतो.

 2. डॉ. ह.वि. सरदेसाई: व्यक्तिमत्त्व व कार्य:

     डॉ. हणमंत विद्याधर सरदेसाई (जन्म : १० एप्रिल १९३३ | निधन : १५ मार्च २०२०) हे नामवंत वैद्यकीय तज्ज्ञ, लेखक आणि समाजप्रबोधक होते. पुण्याच्या बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये ते प्राध्यापक होते. न्यूरोलॉजी विषयात एम.डी. करून त्यांनी वैद्यकीय सेवा, संशोधन आणि लेखन या तिन्ही क्षेत्रांत मोलाचे योगदान दिले.

    आरोग्यविषयक ज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावे, या उद्देशाने त्यांनी विपुल लेखन केले. निरामय जीवनाचे पथदर्शकघरोघरी ज्ञानेश्वर जन्मती यांसारखी त्यांची पुस्तके विशेष गाजली. वैद्यकीय ज्ञान सोप्या भाषेत मांडणारे हे व्यक्तिमत्त्व लोकांनी दिलेल्या ‘धन्वंतरी’ या उपाधीस पूर्णतः पात्र ठरले.

 3.आजच्या काळातील जीवनशैली: समस्या आणि वास्तव:

   जीवनशैली म्हणजे आपले जीवन जगण्याची पद्धत. या पद्धतीचा विचार करताना माणसाचे आचार, विचार, आहार आणि व्यवहार ध्यानात घेतले जातात.  विचारसरणी, आहारपद्धती, शारीरिक हालचाल आणि दैनंदिन वर्तन यांचा एकत्रित परिणाम म्हणजे जीवनक्रम.

    आज डॉक्टरांकडे जाणाऱ्या रुग्णांपैकी सुमारे ८०–८५% आजारांचे मूळ सदोष जीवनशैलीत आढळते. शारीरिक श्रमांचा अभाव, चुकीचा आहार, अपुरी झोप, ताणतणाव आणि व्यसनाधीनता ही यामागची प्रमुख कारणे आहेत. या सर्वांचा थेट परिणाम आपल्या मेंदूवर आणि मानसिक आरोग्यावर होतो. यात बदल हवा असल्यास प्रथम मेंदूचे कार्य समजून घ्यावे लागेल.

 4. मेंदू, मन आणि निओकॉर्टेक्स: वैज्ञानिक दृष्टीकोन:

  मन हे सर्व निर्णयांचे केंद्र आहे आणि मेंदू हा त्या मनाचा जैविक आधार आहे. मन आणि शरीर यांचा संबंध अतूट आहे. मनोशारीरिक व्यवहार एका नाण्याचा दोन बाजू आहेत. अनेक शारीरिक आजारांचे मूळ दीर्घकालीन मानसिक ताण, भीती किंवा चिंतेत आढळते.

 4.1. निओकॉर्टेक्स म्हणजे काय?

        मेंदूच्या बाह्य आवरणाला निओकॉर्टेक्स (Neocortex) म्हणतात. हा भाग पुढील उच्च कार्यांसाठी जबाबदार असतो:

  • विचार व तर्कशक्ती
  • निर्णयक्षमता
  • भाषा व संवाद
  • स्मरणशक्ती
  • भावनांचे नियंत्रण
  • समस्या सोडविण्याची क्षमता

    आधुनिक न्यूरोसायन्सनुसार, मेंदूतील बहुतेक पेशी जन्मानंतर पुन्हा निर्माण होत नाहीत; मात्र त्यांच्यातील जोडणी (Synaptic Connections) आयुष्यभर बदलत राहते. ताणतणाव, व्यसन, अपुरा आहार आणि झोपेचा अभाव यामुळे या जोडण्या कमकुवत होतात. परिणामी स्मरणशक्ती, एकाग्रता व निर्णयक्षमता कमी होऊ शकते.

  4.2.  तणावमुक्त मनस्थितीत निओकॉर्टेक्स:

     शांत, सकारात्मक आणि तणावमुक्त मनस्थितीत निओकॉर्टेक्स अधिक कार्यक्षम राहतो. त्यामुळे समस्या सोडविण्याची क्षमता वाढते आणि मानसिक स्थैर्य टिकते.

     प्रकृती चांगली राखायची असते हे लोकांना माहिती असतं. पण ती कशी चांगली राखायची, याचं मात्र ज्ञान त्यांना नसतं. गैरसमजातून बराच त्रास होतो. प्रकृती चांगली राखायची असेल तर सकस आणि संतुलित आहार, व्यायाम आणि मनाचं आरोग्य ही तीन सूत्रं फार महत्त्वाची आहेत. यासाठी निओकॉर्टेक्स पेशींची संख्या सांभाळून ठेवणे आवश्यक आहे.

 5. निरोगी मेंदूसाठी डॉ. सरदेसाईंचे ABCDEFGH सूत्र:

    डॉ. ह.वि. सरदेसाईंनी सुयोग्य व निरोगी जीवनशैलीसाठी इंग्रजी वर्णमालेतील पहिल्या आठ अक्षरांवर आधारित (ABCDEFGH) एक सोपे, व्यवहार्य आणि शास्त्राधारित सूत्र सांगितले आहे.

  5.1. A – Anxiety (चिंता तणाव):

  मर्यादित ताण प्रेरणादायी ठरतो; मात्र दीर्घकालीन आणि अति ताण मानसिक व शारीरिक आरोग्यास घातक ठरतो. सतत भूतकाळाचा विचार किंवा भविष्यकाळाची भीती मनात ठेवली तर ताण वाढतो.

      समजा परीक्षांमध्ये आलेल्या प्रश्नाची तयारी आपण आदल्या दिवशीच केलेली असेल तर, उत्तर माहित असल्यामुळे आपण उत्साहित होतो. पण तयार न केलेला  प्रश्न दिसल्यावर पेपर कठीण असल्याची जाणीव होऊन तणाव निर्माण होतो. त्यामुळे आपल्या आयुष्यात काय प्रश्न पडण्याची शक्यता आहे याचे अंदाज बांधून त्यांची उत्तरे तयार ठेवले तर, पडलेल्या प्रश्नाचे उत्तर आधीच माहित असल्याचा आनंद सतत उपभोगता येईल.

  वर्तमानात जगणे, समस्यांची पूर्वतयारी करणे आणि वास्तव स्वीकारणे यामुळे तणाव कमी होतो.

  5.2. B – Bottle (दारू व्यसनाधीन पदार्थ):

दारू व अमली पदार्थ मेंदूच्या कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम करतात. हे पदार्थ न्यूरॉन्समधील जोडण्या कमकुवत करतात, ज्यामुळे स्मरणशक्ती, निर्णयक्षमता व भावनिक संतुलन बिघडते. व्यसनाधीनता  हा मानवी मनाचा एक मूलभूत दोष आहे.

   निर्व्यसनी जीवनशैली ही दीर्घकालीन आरोग्यासाठी अत्यावश्यक आहे.

 5.3. C – Cigar (सिगारेट तंबाखू):

तंबाखूमधील विषारी रसायने शरीरातील सर्व पेशींना, विशेषतः मेंदू व हृदयाला हानी पोहोचवतात. त्यामुळे तंबाखूजन्य पदार्थ टाळणे आवश्यक आहे. त्यामुळे हे व्यसन करता सुखी

जीवन जगावे.

 5.4. D – Diet (योग्य आहार):

योग्य, संतुलित व विविधतापूर्ण आहार हा निरोगी जीवनाचा पाया आहे. संपूर्ण धान्ये, डाळी, कडधान्ये, दूध, फळे, भाज्या आणि पुरेसे पाणी यांचा आहारात समावेश असावा.

       वेळेवर व ऋतुनुसार आहार घेतल्यास मेंदू व शरीर दोन्ही निरोगी राहतात.  सर्वात महत्वाचे म्हणजे जेवणाचे वेळ रोज ठराविक असणे आवश्यक आहे. कारण पाचक रस त्या त्या वेळी स्रवतात अन्न पचन चांगले होते.

  5.5. E – Exercise (व्यायाम) 

     प्रकृती चांगली राहण्याकरिता अंतर्बाह्य स्वच्छता आणि सकस आहाराइतकेच महत्वाचे आहे नियमित केलेल्या व्यायाम. नियमित व्यायामामुळे मेंदूत रक्तप्रवाह वाढतो, ताण कमी होतो आणि मानसिक क्षमता सुधारते.

    चालणे, योगासन, प्राणायाम किंवा सूर्यनमस्कार असे व्यायाम रोज किमान ३० मिनिटे करणे उपयुक्त आहे.

  5.6. F – Friend (मित्र सामाजिक नाती):

    आपले मन पारदर्शक असायला हवे. त्यासाठी आपल्या मनातील घटना स्वतःला आणि इतरांना कळल्या पाहिजेत. म्हणून आपण एक सामाजिक जीवनाच्या भाग असणे आवश्यक आहे. जीवापाड प्रेम करणारी  मित्र  परिवार आपल्या बरोबर नित्य नियमाने हवा. 

   सकारात्मक सामाजिक नाती मानसिक आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची असतात. भावना विश्वासू व्यक्तींशी व्यक्त केल्यास मन हलके होते आणि ताण कमी होतो.

   5.6.1. एक बोधकथा:

      इथे आपण एक बोधकथा बघू. एका खेडेगावात रोज संध्याकाळी देवळात कीर्तन चालत असते. तीन-चार म्हाताऱ्या  सासवा तिथे एका कोपऱ्यात येऊन बसत. तिकडे बुवांचा कीर्तन सुरु झालेवर इकडे या  बाया दिवसभर घरात मनाविरुद्ध, विशेषतः सुनेमुळे, घडलेल्या गोष्ठी एकमेकींना सांगत असतात. त्यामुळे त्यांच्या मनातील घाणीचा निचरा होऊन ते सर्व जणी आनंदाने घरी जातात. तिकडे त्यांचे सुनां बॅडमिंटन खेळताना, प्रत्येक चेंडूंबरोबर सासू बद्धल मनात साठविलेल्या गोष्टी मारत असतात. तेही आनंदित होऊन घरी परतल्यामुळे घरात सौख्य नांदत असतो.

  5.7. G – God (श्रद्धा आत्मिक आधार):

   इथे परमेश्वराच्या  संदर्भ एक अगोचर शक्तीशी निगडित आहे. श्रद्धा म्हणजे केवळ धार्मिकता नव्हे, तर मनाला आधार देणारे एक केंद्र. ध्यान, प्रार्थना किंवा शांत आत्मचिंतन यामुळे मानसिक शांतता मिळते.

  5.8.  H – Humor (विनोदबुद्धी):

विनोदाचा परिणाम मनावरील ताण  हलका करण्यासाठी होतो. ताण तणावाला सामोरे जाताना आपली विनोद बुद्धी साबूत ठेवली तर कुठल्याही कठीण प्रसंगाला तोंड देणे शक्य होते. एकत्रितपणे काम करतानाही हास्याचा खूप उपयोग होतो. हसण्यामुळे मेंदूत एंडॉर्फिन्स स्रवतात, जे नैसर्गिक आनंददायी रसायने आहेत. विनोदबुद्धीमुळे ताण कमी होतो, उत्साह वाढतो आणि जीवन अधिक सकारात्मक बनते.

    एकूण काय हास्यविनोद करीत जगत राहिले तर मन आणि शरीर दोन्ही  स्वस्थ राहते. अनेक  आजारांतून बरे होण्याकरिता याचा फायदा होतो. ज्याचे मन प्रसन्न आहे, त्याचीच बुद्धी स्थिर राहते. म्हणून विनोदबुद्धी जागृत ठेवा आनंदी राहा. 

 6. समारोप:

डॉ. ह.वि. सरदेसाई यांनी मांडलेली ABCDEFGH जीवनशैली आजच्या धकाधकीच्या, तणावग्रस्त युगात अत्यंत उपयुक्त आहे. संतुलित आहार, नियमित व्यायाम, सकारात्मक विचार, सामाजिक नाते आणि मानसिक शांतता यांचा समन्वय साधल्यास मेंदू अधिक कार्यक्षम राहतो.

    शांत मन, स्थिर बुद्धी आणि निरोगी शरीर — हाच खरा सुखी व समृद्ध जीवनाचा राजमार्ग आहे.

7.  Video support:

  A.मानसिक ताणातून बाहेर कसे येता येईल? | Dr. H.V. Sardesai खालील विडिओ पहा. 

  B.हास्य साखळी साठी खालील विडिओ पहा.  

निरोगी आरोग्य Archives - Physics Prana