सुयोग्य जीवनशैली: निरोगी आरोग्यासाठी ABCDEFGH सूत्र | डॉ. ह.वि. सरदेसाई

जीवनशैली सुयोग्य सहज: निरोगी आरोग्याकडे नेणारा राजमार्ग

Author:

Prof. Kali Chandrakant

M.Sc., M.Ed., D.C.S.

50+ Years of experience in Physics teaching

 1. प्रस्तावना:

      सुमारे २०–२५ वर्षांपूर्वी सातारा येथील शाहू कलामंदिरात एका हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त पुण्याचे सुप्रसिद्ध डॉ. ह.वि. सरदेसाई यांचे आरोग्य जीवनशैली या विषयावर व्याख्यान झाले होते. सभागृह पूर्ण भरले होते आणि तब्बल तीन तास चाललेल्या त्या व्याख्यानात श्रोते मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते. मी स्वतः त्या व्याख्यानाला उपस्थित होतो.

     डॉ. सरदेसाईंनी अत्यंत साध्या, सरळ आणि शास्त्राधारित शैलीत आरोग्याचे मर्म उलगडून सांगितले. कोरोनासारख्या महामारीनंतरच्या काळातही त्यांचे विचार तितकेच उपयुक्त, कालातीत आणि मार्गदर्शक ठरतात. योग्य, संतुलित व शिस्तबद्ध जीवनशैली अंगीकारली तर कोणत्याही आरोग्यसंकटाला आपण अधिक सक्षमपणे सामोरे जाऊ शकतो.

 2. डॉ. ह.वि. सरदेसाई: व्यक्तिमत्त्व व कार्य:

     डॉ. हणमंत विद्याधर सरदेसाई (जन्म : १० एप्रिल १९३३ | निधन : १५ मार्च २०२०) हे नामवंत वैद्यकीय तज्ज्ञ, लेखक आणि समाजप्रबोधक होते. पुण्याच्या बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये ते प्राध्यापक होते. न्यूरोलॉजी विषयात एम.डी. करून त्यांनी वैद्यकीय सेवा, संशोधन आणि लेखन या तिन्ही क्षेत्रांत मोलाचे योगदान दिले.

    आरोग्यविषयक ज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावे, या उद्देशाने त्यांनी विपुल लेखन केले. निरामय जीवनाचे पथदर्शकघरोघरी ज्ञानेश्वर जन्मती यांसारखी त्यांची पुस्तके विशेष गाजली. वैद्यकीय ज्ञान सोप्या भाषेत मांडणारे हे व्यक्तिमत्त्व लोकांनी दिलेल्या ‘धन्वंतरी’ या उपाधीस पूर्णतः पात्र ठरले.

 3.आजच्या काळातील जीवनशैली: समस्या आणि वास्तव:

   जीवनशैली म्हणजे आपले जीवन जगण्याची पद्धत. या पद्धतीचा विचार करताना माणसाचे आचार, विचार, आहार आणि व्यवहार ध्यानात घेतले जातात.  विचारसरणी, आहारपद्धती, शारीरिक हालचाल आणि दैनंदिन वर्तन यांचा एकत्रित परिणाम म्हणजे जीवनक्रम.

    आज डॉक्टरांकडे जाणाऱ्या रुग्णांपैकी सुमारे ८०–८५% आजारांचे मूळ सदोष जीवनशैलीत आढळते. शारीरिक श्रमांचा अभाव, चुकीचा आहार, अपुरी झोप, ताणतणाव आणि व्यसनाधीनता ही यामागची प्रमुख कारणे आहेत. या सर्वांचा थेट परिणाम आपल्या मेंदूवर आणि मानसिक आरोग्यावर होतो. यात बदल हवा असल्यास प्रथम मेंदूचे कार्य समजून घ्यावे लागेल.

 4. मेंदू, मन आणि निओकॉर्टेक्स: वैज्ञानिक दृष्टीकोन:

  मन हे सर्व निर्णयांचे केंद्र आहे आणि मेंदू हा त्या मनाचा जैविक आधार आहे. मन आणि शरीर यांचा संबंध अतूट आहे. मनोशारीरिक व्यवहार एका नाण्याचा दोन बाजू आहेत. अनेक शारीरिक आजारांचे मूळ दीर्घकालीन मानसिक ताण, भीती किंवा चिंतेत आढळते.

 4.1. निओकॉर्टेक्स म्हणजे काय?

        मेंदूच्या बाह्य आवरणाला निओकॉर्टेक्स (Neocortex) म्हणतात. हा भाग पुढील उच्च कार्यांसाठी जबाबदार असतो:

  • विचार व तर्कशक्ती
  • निर्णयक्षमता
  • भाषा व संवाद
  • स्मरणशक्ती
  • भावनांचे नियंत्रण
  • समस्या सोडविण्याची क्षमता

    आधुनिक न्यूरोसायन्सनुसार, मेंदूतील बहुतेक पेशी जन्मानंतर पुन्हा निर्माण होत नाहीत; मात्र त्यांच्यातील जोडणी (Synaptic Connections) आयुष्यभर बदलत राहते. ताणतणाव, व्यसन, अपुरा आहार आणि झोपेचा अभाव यामुळे या जोडण्या कमकुवत होतात. परिणामी स्मरणशक्ती, एकाग्रता व निर्णयक्षमता कमी होऊ शकते.

  4.2.  तणावमुक्त मनस्थितीत निओकॉर्टेक्स:

     शांत, सकारात्मक आणि तणावमुक्त मनस्थितीत निओकॉर्टेक्स अधिक कार्यक्षम राहतो. त्यामुळे समस्या सोडविण्याची क्षमता वाढते आणि मानसिक स्थैर्य टिकते.

     प्रकृती चांगली राखायची असते हे लोकांना माहिती असतं. पण ती कशी चांगली राखायची, याचं मात्र ज्ञान त्यांना नसतं. गैरसमजातून बराच त्रास होतो. प्रकृती चांगली राखायची असेल तर सकस आणि संतुलित आहार, व्यायाम आणि मनाचं आरोग्य ही तीन सूत्रं फार महत्त्वाची आहेत. यासाठी निओकॉर्टेक्स पेशींची संख्या सांभाळून ठेवणे आवश्यक आहे.

 5. निरोगी मेंदूसाठी डॉ. सरदेसाईंचे ABCDEFGH सूत्र:

    डॉ. ह.वि. सरदेसाईंनी सुयोग्य व निरोगी जीवनशैलीसाठी इंग्रजी वर्णमालेतील पहिल्या आठ अक्षरांवर आधारित (ABCDEFGH) एक सोपे, व्यवहार्य आणि शास्त्राधारित सूत्र सांगितले आहे.

  5.1. A – Anxiety (चिंता तणाव):

  मर्यादित ताण प्रेरणादायी ठरतो; मात्र दीर्घकालीन आणि अति ताण मानसिक व शारीरिक आरोग्यास घातक ठरतो. सतत भूतकाळाचा विचार किंवा भविष्यकाळाची भीती मनात ठेवली तर ताण वाढतो.

      समजा परीक्षांमध्ये आलेल्या प्रश्नाची तयारी आपण आदल्या दिवशीच केलेली असेल तर, उत्तर माहित असल्यामुळे आपण उत्साहित होतो. पण तयार न केलेला  प्रश्न दिसल्यावर पेपर कठीण असल्याची जाणीव होऊन तणाव निर्माण होतो. त्यामुळे आपल्या आयुष्यात काय प्रश्न पडण्याची शक्यता आहे याचे अंदाज बांधून त्यांची उत्तरे तयार ठेवले तर, पडलेल्या प्रश्नाचे उत्तर आधीच माहित असल्याचा आनंद सतत उपभोगता येईल.

  वर्तमानात जगणे, समस्यांची पूर्वतयारी करणे आणि वास्तव स्वीकारणे यामुळे तणाव कमी होतो.

  5.2. B – Bottle (दारू व्यसनाधीन पदार्थ):

दारू व अमली पदार्थ मेंदूच्या कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम करतात. हे पदार्थ न्यूरॉन्समधील जोडण्या कमकुवत करतात, ज्यामुळे स्मरणशक्ती, निर्णयक्षमता व भावनिक संतुलन बिघडते. व्यसनाधीनता  हा मानवी मनाचा एक मूलभूत दोष आहे.

   निर्व्यसनी जीवनशैली ही दीर्घकालीन आरोग्यासाठी अत्यावश्यक आहे.

 5.3. C – Cigar (सिगारेट तंबाखू):

तंबाखूमधील विषारी रसायने शरीरातील सर्व पेशींना, विशेषतः मेंदू व हृदयाला हानी पोहोचवतात. त्यामुळे तंबाखूजन्य पदार्थ टाळणे आवश्यक आहे. त्यामुळे हे व्यसन करता सुखी

जीवन जगावे.

 5.4. D – Diet (योग्य आहार):

योग्य, संतुलित व विविधतापूर्ण आहार हा निरोगी जीवनाचा पाया आहे. संपूर्ण धान्ये, डाळी, कडधान्ये, दूध, फळे, भाज्या आणि पुरेसे पाणी यांचा आहारात समावेश असावा.

       वेळेवर व ऋतुनुसार आहार घेतल्यास मेंदू व शरीर दोन्ही निरोगी राहतात.  सर्वात महत्वाचे म्हणजे जेवणाचे वेळ रोज ठराविक असणे आवश्यक आहे. कारण पाचक रस त्या त्या वेळी स्रवतात अन्न पचन चांगले होते.

  5.5. E – Exercise (व्यायाम) 

     प्रकृती चांगली राहण्याकरिता अंतर्बाह्य स्वच्छता आणि सकस आहाराइतकेच महत्वाचे आहे नियमित केलेल्या व्यायाम. नियमित व्यायामामुळे मेंदूत रक्तप्रवाह वाढतो, ताण कमी होतो आणि मानसिक क्षमता सुधारते.

    चालणे, योगासन, प्राणायाम किंवा सूर्यनमस्कार असे व्यायाम रोज किमान ३० मिनिटे करणे उपयुक्त आहे.

  5.6. F – Friend (मित्र सामाजिक नाती):

    आपले मन पारदर्शक असायला हवे. त्यासाठी आपल्या मनातील घटना स्वतःला आणि इतरांना कळल्या पाहिजेत. म्हणून आपण एक सामाजिक जीवनाच्या भाग असणे आवश्यक आहे. जीवापाड प्रेम करणारी  मित्र  परिवार आपल्या बरोबर नित्य नियमाने हवा. 

   सकारात्मक सामाजिक नाती मानसिक आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची असतात. भावना विश्वासू व्यक्तींशी व्यक्त केल्यास मन हलके होते आणि ताण कमी होतो.

   5.6.1. एक बोधकथा:

      इथे आपण एक बोधकथा बघू. एका खेडेगावात रोज संध्याकाळी देवळात कीर्तन चालत असते. तीन-चार म्हाताऱ्या  सासवा तिथे एका कोपऱ्यात येऊन बसत. तिकडे बुवांचा कीर्तन सुरु झालेवर इकडे या  बाया दिवसभर घरात मनाविरुद्ध, विशेषतः सुनेमुळे, घडलेल्या गोष्ठी एकमेकींना सांगत असतात. त्यामुळे त्यांच्या मनातील घाणीचा निचरा होऊन ते सर्व जणी आनंदाने घरी जातात. तिकडे त्यांचे सुनां बॅडमिंटन खेळताना, प्रत्येक चेंडूंबरोबर सासू बद्धल मनात साठविलेल्या गोष्टी मारत असतात. तेही आनंदित होऊन घरी परतल्यामुळे घरात सौख्य नांदत असतो.

  5.7. G – God (श्रद्धा आत्मिक आधार):

   इथे परमेश्वराच्या  संदर्भ एक अगोचर शक्तीशी निगडित आहे. श्रद्धा म्हणजे केवळ धार्मिकता नव्हे, तर मनाला आधार देणारे एक केंद्र. ध्यान, प्रार्थना किंवा शांत आत्मचिंतन यामुळे मानसिक शांतता मिळते.

  5.8.  H – Humor (विनोदबुद्धी):

विनोदाचा परिणाम मनावरील ताण  हलका करण्यासाठी होतो. ताण तणावाला सामोरे जाताना आपली विनोद बुद्धी साबूत ठेवली तर कुठल्याही कठीण प्रसंगाला तोंड देणे शक्य होते. एकत्रितपणे काम करतानाही हास्याचा खूप उपयोग होतो. हसण्यामुळे मेंदूत एंडॉर्फिन्स स्रवतात, जे नैसर्गिक आनंददायी रसायने आहेत. विनोदबुद्धीमुळे ताण कमी होतो, उत्साह वाढतो आणि जीवन अधिक सकारात्मक बनते.

    एकूण काय हास्यविनोद करीत जगत राहिले तर मन आणि शरीर दोन्ही  स्वस्थ राहते. अनेक  आजारांतून बरे होण्याकरिता याचा फायदा होतो. ज्याचे मन प्रसन्न आहे, त्याचीच बुद्धी स्थिर राहते. म्हणून विनोदबुद्धी जागृत ठेवा आनंदी राहा. 

 6. समारोप:

डॉ. ह.वि. सरदेसाई यांनी मांडलेली ABCDEFGH जीवनशैली आजच्या धकाधकीच्या, तणावग्रस्त युगात अत्यंत उपयुक्त आहे. संतुलित आहार, नियमित व्यायाम, सकारात्मक विचार, सामाजिक नाते आणि मानसिक शांतता यांचा समन्वय साधल्यास मेंदू अधिक कार्यक्षम राहतो.

    शांत मन, स्थिर बुद्धी आणि निरोगी शरीर — हाच खरा सुखी व समृद्ध जीवनाचा राजमार्ग आहे.

7.  Video support:

  A.मानसिक ताणातून बाहेर कसे येता येईल? | Dr. H.V. Sardesai खालील विडिओ पहा. 

  B.हास्य साखळी साठी खालील विडिओ पहा.  

इकिगाई म्हणजे काय? | Ikigai Japanese Secret of Happy and Long Life

“इकिगाई म्हणजे नेमकं काय? प्रत्येकाने समजून घ्यावं असं जपानी जीवनरहस्य”

Ikigai Japanese Secret of Happy and Long Life

Author:
Prof. Kali C. S.
M.Sc., M.Ed., D.C.S.
50+ Years of Experience in Physics Teaching

1. प्रस्तावना: (Introduction):

      मी या पृथ्वीतलावर का आलो आहे? माझ्या जगण्याचा खरा उद्देश काय आहे? असे प्रश्न तुम्ही कधी स्वतःला विचारले आहेत का? रोजच्या धकाधकीच्या जीवनात आपण इतके अडकतो की जीवनाचा खरा अर्थ शोधायचा राहून जातो.

जपानी लोकांनी याच प्रश्नाचे एक सुंदर उत्तर शोधले आहे — ते म्हणजे इकिगाई‘ (IKIGAI). इकिगाई हा केवळ शब्द नसून निरोगी, आनंदी आणि अर्थपूर्ण जीवन जगण्याचा एक मूलमंत्र आहे.

2. इकिगाई म्हणजे नक्की काय? (What is Ikigai?):

   ‘इकिगाई‘ हा दोन जपानी शब्दांपासून बनला आहे: इकी‘ (Iki) म्हणजे जीवन आणि गाई‘ (Gai) म्हणजे मूल्य किंवा फळ. थोडक्यात सांगायचे तर, इकिगाई म्हणजे तुमच्या अस्तित्वाचे कारण” (Reason for Being).

    जपानी संस्कृतीनुसार, प्रत्येक व्यक्ती एका विशिष्ट हेतूसाठी जन्माला येते आणि तो हेतू शोधणे म्हणजेच इकिगाई प्राप्त करणे होय.

3. एका जपानी स्त्रीची हृदयस्पर्शी कथा:

     एका जपानी स्त्रीला कोमामध्ये असताना एक स्वप्न पडले. ती स्वर्गात पोहोचली तेव्हा पूर्वजांनी तिला विचारले, “तू कोण आहेस?”

       तिने उत्तर दिले, “मी महापौरांची पत्नी आहे”, “मी शिक्षिका आहे”, “मी चार मुलांची आई आहे”. पण प्रत्येक वेळी तिचे उत्तर नाकारले गेले. शेवटी ती म्हणाली:

    “मी ती आहे जी माझ्या कुटुंबाची जबाबदारी घेते, मुलांवर चांगले संस्कार करते आणि त्यातून मला आनंद मिळतो.

       हे उत्तर स्वीकारले गेले आणि ती कोमातून बाहेर आली. तिला तिच्या जीवनाचा खरा उद्देश म्हणजेच इकिगाई सापडला होता.

4. तुमचा इकिगाई कसा शोधायचा? (The Ikigai Framework):

      इकिगाई हा चार मुख्य घटकांच्या संयोगातून तयार होतो. तुम्ही तुमच्या आयुष्यातील इकिगाई शोधण्यासाठी खालील आकृतीचा (Fig. A) आधार घेऊ शकता.

   आकृतीत दाखविल्याप्रमाणे  चार वर्तुळे बनवा . त्यामध्ये पुढील विवेचनानुसार आपला माहिती भरा.

Fig. A

4.1. तुम्हाला काय आवडते? (What you love):

   तुमचे छंद, जसे की कविता, शिकवणे किंवा खेळ.

4.2. तुम्ही कशात तज्ञ आहात? (What you are good at):

    अशी कामे जी तुम्ही आत्मविश्वासाने आणि कौशल्याने करू शकता.

4.3. जगाला कशाची गरज आहे? (What the world needs):

     समाजसेवा किंवा इतरांना मदत होईल असे कार्य.

4.4. तुम्हाला कशासाठी पैसे मिळू शकतात? (What you can be paid for):

    तुमची नोकरी, व्यवसाय किंवा कौशल्य ज्यातून उत्पन्न मिळते.

  5.  चार संकल्पनांचे छेदनबिंदू:

    जेव्हा दोन वर्तुळे एकमेकांना छेदतात (Fig. B), तेव्हा काय तयार होते ते पहा.

Fig.B

छेदनबिंदू अर्थ
आवड + कौशल्य पॅशन (Passion)
कौशल्य + पैसा पेशा (Profession)
पैसा + समाज व्यवसाय (Vocation)
आवड + समाज ध्येय (Mission)

6. दोन वर्तुळांच्या छेदनबिंदूपासून तयार होणाऱ्या संकल्पना: (Fig C)

Fig.C

    आता तुमच्याकडे चारही वर्तुळांमध्ये (रकान्यांमध्ये) विविध गोष्टींची यादी तयार झालेली असेल.
   पुढील टप्प्यात, प्रत्येकी दोन वर्तुळांमधील समान (Common) गोष्टी शोधायच्या आहेत.
  Fig C मध्ये हे छेदनबिंदू क्रमांकांनी दर्शवले आहेत.

  6.1. आवड (Passion) – वर्तुळ 1 आणि वर्तुळ 2 :

     वर्तुळ 1 (तुम्हाला काय करायला आवडते?)
    आणि
    वर्तुळ 2 (तुम्ही कशात तज्ञ आहात?)

      या दोन्ही वर्तुळांच्या छेदनबिंदूला आवड (Passion) असे म्हणतात.

    म्हणजे असे काम:

  • जे तुम्हाला मनापासून करायला आवडते
  • आणि जे तुम्ही आत्मविश्वासाने, कुशलतेने करू शकता

   उदाहरण:

  • मला क्रिकेट खेळायला आवडते आणि मी त्यात तरबेज आहे, तर क्रिकेट ही माझी आवड (Passion) आहे.
  • मला फिजिक्स विषय आवडतो आणि मी फिजिक्समध्ये तज्ञ आहे, तर फिजिक्स ही माझी आवड आहे.

6.2. पेशा (Profession) – वर्तुळ 2 आणि वर्तुळ 3 :

  वर्तुळ 2 (तुम्ही कशात तज्ञ आहात?)
  आणि
   वर्तुळ 3 (कशासाठी तुम्हाला पैसे मिळू शकतात?)

  या दोन्ही वर्तुळांच्या छेदनबिंदूपासून पेशा (Profession) तयार होतो.

  म्हणजे असे काम:

  • जे तुम्ही उत्तम प्रकारे करू शकता
  • आणि ज्यासाठी तुम्हाला मोबदला / मानधन मिळते

  उदाहरण:
   जर एखादी व्यक्ती अनुभवी आर्थिक तज्ञ असेल आणि तिचे मोठे व्यावसायिक नेटवर्क असेल, तर ती:

  • संस्था उभारण्यासाठी निधी गोळा करू शकते
  • छोट्या कंपन्यांना मोफत मार्गदर्शन देऊ शकते
  • व्यक्तींना प्रशिक्षण देऊ शकते

 अशा प्रकारे ती व्यक्ती आपल्या कौशल्यांचा वापर करून समाजावर सकारात्मक प्रभाव टाकते.

   माझ्या बाबतीत:
   फिजिक्स विषय शिकवणे तसेच ब्लॉग व व्हिडिओद्वारे फिजिक्स समजावून सांगणे — हा माझा पेशा आहे.

6.3. व्यवसाय (Vocation) – वर्तुळ 3 आणि वर्तुळ 4 :

   वर्तुळ 3 (कशातून पैसे मिळतात?)
  आणि
   वर्तुळ 4 (जगाला कशाची गरज आहे?)

  या दोन्ही वर्तुळांच्या छेदनबिंदूला व्यवसाय (Vocation) असे म्हणतात.

   म्हणजे असे काम:

  • जे लोकांच्या समस्यांवर उपाय देते
  • आणि ज्यातून आर्थिक लाभ मिळतो

    खरं तर, कोणत्याही यशस्वी व्यवसायाचा पाया हा लोकांच्या गरजांवर आणि समस्यांवर आधारित असतो.

    उदाहरण:

  • १०–२० वर्षांपूर्वी वस्तू घरपोच मिळत नव्हत्या.
  • Amazon ने ही गरज ओळखली आणि आज संपूर्ण जगाला घरबसल्या खरेदीची सुविधा दिली.

   माझ्या बाबतीत:
   फिजिक्स विषयांवरील ब्लॉग्स आणि YouTube व्हिडिओंमधून आर्थिक लाभ मिळवणे — हा माझा व्यवसाय आहे.

6.4. विशेष उद्दिष्ट (Mission) – वर्तुळ 1 आणि वर्तुळ 4 :

  वर्तुळ 1 (तुम्हाला काय करायला आवडते?)
 आणि
 वर्तुळ 4 (जगाला कशाची गरज आहे?)

   या दोन्ही वर्तुळांच्या छेदनबिंदूपासून विशेष उद्दिष्ट (Mission) तयार होते.

   म्हणजे असे कार्य:

  • जे तुम्हाला करायला आवडते
  • आणि ज्याचा समाजाला, लोकांना उपयोग होतो

   अशा व्यक्ती सहसा समाजसेवा, शिक्षण, मार्गदर्शन किंवा मानवतावादी कार्यात कार्यरत असतात.

  उदाहरण:

  • डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे Mission 2020 हे भारताला महासत्ता बनवण्याचे स्वप्न होते.
    ते जनतेच्या हितासाठी झटत होते, म्हणूनच ते एक विशेष उद्दिष्ट होते.

   माझे विशेष उद्दिष्ट:
  सन 2035 पर्यंत:

  • 100 ब्लॉग्स लिहिणे.
  • 100 YouTube व्हिडिओ पोस्ट करणे.
  • एक लाख विद्यार्थ्यांना फिजिक्स विषयात मार्गदर्शन करणे.

 7. लेखकाचा स्वतःचा इकिगाई (एक उदाहरण):

    मी ५० वर्षांहून अधिक काळ फिजिक्स (Physics) शिकवण्याचा अनुभव असलेला एक निवृत्त प्राध्यापक आहे. आज ७५ व्या वर्षीही मी उत्साही आहे कारण मला माझा इकिगाई सापडला आहे. (Fig. D)

Fig. D

  • आवड व कौशल्य: फिजिक्स विषयाचे सखोल ज्ञान आणि ते शिकवण्याची ओढ.
  • उत्पन्न व समाजोपयोग: ब्लॉगिंग आणि YouTube द्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे.

माझा इकिगाई मंत्र: फिजिक्सबद्दल सोप्या भाषेत ब्लॉग लिहिणे आणि व्हिडिओद्वारे विद्यार्थ्यांना शिक्षित करणे.”

8. जपानी लोकांच्या दीर्घायुष्याची ५ गुपिते:

    जपानमधील ओकिनावा बेटावरील लोक जगातील सर्वाधिक काळ जगणाऱ्या लोकांपैकी एक आहेत. त्यांच्या जीवनशैलीत खालील गोष्टींचा समावेश असतो:

  8.1. हारा-हाची-बु (Hara Hachi Bu):

   पोट फक्त ८०% भरेपर्यंतच जेवा.

 8.2. सतत सक्रिय राहा: निवृत्तीपेक्षा कार्यरत राहण्यावर जास्त भर दिला जातो…”.

    ते शेवटपर्यंत कार्यरत राहण्यात विश्वास ठेवतात.

  8.3. मानसिक आरोग्य:

   वर्तमानात जगा आणि अनावश्यक चिंता सोडा.

 8.4. सामाजिक नाते:

   मित्र आणि कुटुंब यांच्याशी घट्ट जोडलेले राहा.

 8.5. निसर्गाच्या सानिध्यात:

  ताजी हवा आणि सकस आहार घ्या.

9. निष्कर्ष:

  प्रत्येक व्यक्तीचा इकिगाई वेगळा असतो. तो शोधणे हीच जीवनाची खरी साधना आहे. जेव्हा तुम्हाला तुमचा इकिगाई सापडतो, तेव्हा निवृत्ती हा शब्द अर्थहीन होतो आणि प्रत्येक दिवस उत्साहाने भरलेला असतो.

  तुमचा इकिगाई शोधण्याचा प्रयत्न आजच सुरू करा!

  अधिक माहितीसाठी इकिगाई वरील पुस्तक वाचा.

  • पुस्तकाचे नाव :– इकिगाई जगभरातील लाखो लोकांनी गौरविलेले बेस्ट
  • सेलर  पुस्तक
  • लेखक :हेक्टर गार्सिया, फ्रान्सिस मिरेलस
  • अनुवादक :- प्रसाद ढापरे
  • प्रकाशकमायमिरर पब्लिशिंग हाउस,  पुणे

   या पुस्तकात लेखकाने जपानमधील ओकिनावा बेटावरील लोकांच्या दीर्घायुषी, निरोगी, आणि आनंदी जीवन जगण्याचे रहस्य उलगडून दाखवले आहे.

10. Video support:

 

अर्धजागृत मनाला प्रोग्राम कसे करावे? | ध्येयपूर्तीचे ८ टप्पे | How to use Subconscious Mind in Marathi

भाग २: “अर्धजागृत मनाचा वापर कसा करावा? यशस्वी होण्याचे ८ प्रभावी टप्पे”

Author:
Prof. Kali C. S.
M.Sc., M.Ed., D.C.S.
50+ Years of Experience in Physics Teaching

  1.प्रस्तावना: ज्ञानापेक्षा आचरण महत्त्वाचे:

    भाग १ मध्ये आपण पाहिले की, अर्धजागृत मन म्हणजे नक्की काय आणि त्याची शक्ती किती अफाट आहे. पण खरी जादू तेव्हाच घडते, जेव्हा ही शक्ती आपण योग्य पद्धतीने आपल्या आयुष्यात उपयोगात आणतो.

   1.1. तुमच्या अंतर्मनाचा प्रोग्रामिंग कसे कराल?

    अर्धजागृत मन म्हणजे एक सुपीक जमीन आहे. तुम्ही त्यात जे पेराल, तेच उगवेल. जर तुम्ही नकारात्मक विचार पेरले तर काटे येतील आणि सकारात्मक विचार पेरले तर फुले फुलतील. हे मन वापरण्यासाठी खालील ८ टप्प्यांचा अवलंब करा.

 2. यशस्वी होण्यासाठी ८ सुवर्ण चरण (Steps):

   2.1. निस्वार्थ संकल्प करा: ( The Power of Intention):

          परिवर्तनाची पहिली पायरी म्हणजे ‘संकल्प’. तुमचा हेतू जितका मोठा, तितकी मनाची ताकद जास्त.

      तुमचे ध्येय फक्त स्वतःपुरते मर्यादित न ठेवता त्यात कुटुंब, समाज किंवा देशाचे कल्याण जोडा. जेव्हा हेतू मोठा असतो, तेव्हा निसर्ग तुम्हाला जास्त मदत करतो.

  2.2 स्पष्ट ध्येय निश्चित करा: (Goal Setting):

      तुमच्या आयुष्यात तुम्हाला नक्की काय हवे आहे?

    ध्येय कसे असावे?

  • भौतिक (Career, Wealth)
  • मानसिक (Peace, Confidence)
  • सामाजिक (Contribution)
  • आध्यात्मिक (Inner Growth)

    सर्व पैलूंचे संतुलन असलेले ध्येय निवडा.

   तुमचे ध्येय ‘बर्निंग डिझायर’ (तीव्र इच्छा) असले पाहिजे. अर्धजागृत मन फक्त तीव्र भावनेने दिलेल्या आदेशांना प्रतिसाद देते.

  2.3.  सकारात्मक मान्यता: (Belief System):

   ध्येय असलं, तरी त्याविरुद्ध नकारात्मक मान्यता असतील तर प्रगती थांबते.

   उदा.

  • “हे माझ्याने होणार नाही”
  • “माझ्यात क्षमता नाही”

  अशा विचारांना जाणीवपूर्वक बदलणे गरजेचे आहे.

  नवी मान्यता ठेवा:

      “काहीही झाले तरी मी ध्येय गाठणारच.”

    “मला हे शक्य आहे,”

    हा विश्वास मनात पक्का करा. मनात शंका असेल तर अर्धजागृत मन काम करत नाही.

  2.4.  भावनेची जोड द्या: (Emotional Connection):

      केवळ विचार करून चालत नाही, त्या विचारासोबत ‘भावना’ हवी. ध्येय साध्य झाल्यावर तुम्हाला जो आनंद होईल, तो आत्ताच अनुभवा. ध्येयाला भावना जोडल्याशिवाय अर्धजागृत मन सक्रिय होत नाही.

    म्हणून स्वतःला विचारा:

  • ध्येय साध्य झाल्यावर मला कसं वाटेल?
  • आनंद, अभिमान, समाधान कसं असेल?

 ही भावना जितकी तीव्र, तितका परिणाम अधिक प्रभावी.

  2.5. अल्पावस्थेत मनोचित्रण: (Visualization):

    रात्री झोपण्यापूर्वी किंवा सकाळी उठल्याबरोबर आपले मन ‘अल्फा’ (Alpha) स्थितीत असते. यावेळी आपले ध्येय पूर्ण झाल्याचे रंगीत चित्र डोळ्यांसमोर पहा. आता सर्वात महत्त्वाचा टप्पा.

    मनोचित्रण कसे करावे?

  • शांत अवस्थेत बसा
  • डोळे बंद करा
  • स्वतःला ध्येय साध्य झालेलं जिवंत चित्रासारखं पहा
  • रंग, आवाज, भावना अनुभवा

     अर्धजागृत मन चित्रांमध्ये विचार करतं, शब्दांमध्ये नाही.

  2.6.  स्वयं सूचना (Affirmations): (Autosuggestion):

    यानंतर, स्वतःला सकारात्मक सूचना देणे आवश्यक आहे.

  उदा.:

  • “मला हवे ते मी नक्की मिळवणारच.”
  • “माझं मन आणि शरीर माझ्यासाठी काम करत आहे.”

   या सूचना:

  • दररोज
  • अल्फा अवस्थेत
  • भावनेने द्याव्यात

  स्वतःला वारंवार सांगा, “मी अत्यंत बुद्धिमान आहे,” “मी यशस्वी होत आहे.” या सूचना थेट अंतर्मनात जातात.

  2.7. उद्दीपकांचा वापर करा: (Catalysts):

     ध्येय साध्य करण्यासाठी काही उध्दिपक अत्यंत प्रभावी ठरतात:

  • मौन
  • उपवास
  • ध्यान
  • प्रार्थना
  • सकारात्मक विचार
  • अल्फा म्युझिक ऐकणे

      या सवयींमुळे अर्धजागृत मन धोरणबद्ध रीतीने सक्रिय होते आणि ध्येय प्राप्तीचा मार्ग सोपा होतो.

  2.8. संयम आणि श्रद्धा: (Patience):

       बी पेरल्यावर ते लगेच उगवत नाही. योग्य वेळ आल्यावर तुमचे अंतर्मन तुमच्या आयुष्यात चमत्कार घडवून आणेल, तोपर्यंत पूर्ण श्रद्धा ठेवा.

   त्याचप्रमाणे:

  • योग्य संकल्प
  • योग्य मनोचित्रण
  • सातत्यपूर्ण अभ्यास

     असल्यास परिणाम अटळ असतो.

       विश्वाची वेळ अचूक असते — आपल्याला फक्त धीर ठेवायचा असतो.

  3. अंतःकरण शुद्धी: अदृश्य पण निर्णायक घटक:

    सर्व प्रक्रियांचा पाया म्हणजे:

  • प्रेम
  • दया
  • क्षमा

       द्वेष, मत्सर आणि नकारात्मकता मनाची ऊर्जा अडवतात.
      शुद्ध अंतःकरण असलेले मनच खऱ्या अर्थाने शक्तिशाली असते.

  4. तुम्हीही ‘ते’ ४% लोक बनू शकता!

     जगातील केवळ ४% लोकांनीच या शक्तीचा वापर करून इतिहास घडवला आहे. मग ते संत ज्ञानेश्वर असोत, स्वामी विवेकानंद असोत किंवा आधुनिक काळातील अब्दुल कलाम आणि सचिन तेंडुलकर.

  4.1. कर्मवीर भाऊराव पाटील:

       “शिक्षण हेच परिवर्तनाचे साधन” हा विश्वास त्यांनी अंतर्मनातून कृतीत आणला. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी अर्धजागृत मनाच्या शक्तीचा आणि वरील चरणांचा वापर करून ‘रयत शिक्षण संस्थेचे’ एका वटवृक्षात कसे रूपांतर केले, यावर ही छोटी टिपण:

 कर्मवीर भाऊराव पाटील: अर्धजागृत मनाच्या शक्तीचा जिवंत अविष्कार:

     १९१९ मध्ये साताऱ्यातील ‘काले‘ या गावी कर्मवीरांनी रयत शिक्षण संस्थेचे छोटेसे रोपटे लावले. आज त्याचे विशाल वटवृक्षात रूपांतर झाले आहे, यामागे त्यांच्या अंतर्मनाची प्रचंड शक्ती आणि नियोजित कृती होती:

4.1.1. ध्येय आणि संकल्प:

  कर्मवीरांचा संकल्प केवळ स्वतःसाठी नव्हता, तर तो ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ असा होता. ग्रामीण भागातील गरिबांच्या मुलांपर्यंत शिक्षण पोहोचवणे हे त्यांचे स्पष्ट आणि ‘बर्निंग डिझायर’ असलेले ध्येय होते.

 4.1.2. अढळ विश्वास (Belief System):

    “स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद” हे त्यांनी केवळ तोंडाने म्हटले नाही, तर आपल्या अर्धजागृत मनात पक्के रुजवले. जेव्हा लोक त्यांच्या या कल्पनेला हसायचे, तेव्हा त्यांच्या अंतर्मनातील ठाम विश्वासामुळेच ते डगमगले नाहीत.

 4.1.3.  मनोचित्रण आणि भावना (Visualization):

    कर्मवीरांनी गरिबांची मुले शिकून मोठी होत आहेत, हे चित्र आपल्या अंतर्मनात सतत जिवंत ठेवले होते. ‘कमवा आणि शिका’ या योजनेमागे त्यांची हीच दूरदृष्टी आणि भावनिक जोड होती.

  4.1.4. सातत्यपूर्ण प्रयत्न (Efforts and Patience):

   बी पेरल्यावर त्याचे वटवृक्ष होण्यासाठी अनेक दशके लागतात. कर्मवीरांनी अर्धजागृत मनाच्या सहाय्याने प्रतिकूल परिस्थितीतही (दुष्काळ, पैशांची कमतरता) संयम ठेवला. त्यांनी स्वतःच्या पत्नीचे दागिने विकले, पण आपल्या ध्येयापासून ते मागे हटले नाहीत.

  4.1.5. अंतःकरण शुद्धी:

        त्यांच्या कामात कमालीची पारदर्शकता, गरिबांबद्दल दया आणि समाजासाठी त्याग होता. त्यांच्या शुद्ध अंतःकरणामुळेच विश्वाच्या शक्तीने त्यांना वेळोवेळी मदत केली.

         १९१९ मध्ये लावलेले ते एक छोटे रोपटे आज हजारो शाखांच्या माध्यमातून लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य घडवत आहे. कर्मवीर भाऊराव पाटील हे ‘अर्धजागृत मनाचा’ वापर करून शून्य उभे करण्याचे जगातील सर्वोत्तम उदाहरण आहेत.

  5. निष्कर्ष: अल्लादीनचा चिराग तुमच्याच हातात आहे:

  थोडक्यात:

  • अर्धजागृत मन म्हणजे तुमच्यातील सर्वात मोठी शक्ती
  • योग्य पद्धतीने वापरल्यास जीवन बदलू शकते
  • विचार, भावना आणि सातत्य हेच यशाचे सूत्र आहे

अल्लादीनचा चिराग बाहेर नाही तो तुमच्याच आत आहे.

     तुमच्या अंतर्मनाची शक्ती ओळखा आणि आजपासूनच तुमच्या यशाचा प्रवास सुरू करा!

6. Video support:

हे व्हिडिओ नक्की पहा  (Reference Video)

अर्धजागृत मन काय आहे? | अल्लादीनचा दिवा आणि मानवी मन | Subconscious Mind in Marathi

भाग : अल्लादीनचा जादूचा दिवा तुमच्या अर्धजागृत मनाची अफाट शक्ती!

Author:

Prof. Kali Chandrakant

M.Sc., M.Ed., D.C.S.

50+ Years of experience in Physics teaching

    1.प्रस्तावना:

    ” विचारांपासून वास्तवापर्यंतचा प्रवास: तुमच्या आत दडलेला अल्लादीनचा जीन:”

    अल्लादीनच्या गोष्टीतला ‘जीन’ तुम्हाला आठवतोय? जो एका चिराग मधून बाहेर यायचा आणि मालकाची प्रत्येक आज्ञा पाळायचा. पण तुम्हाला माहीत आहे का? आपल्या सर्वांकडे असा एक जादूचा दिवा आहे आणि तो म्हणजे आपले अर्धजागृत मन (Subconscious Mind).

     या विश्वात कोणतीही गोष्ट भौतिक स्वरूपात प्रकट होण्याआधी ती प्रथम विचाररूपात जन्माला येते.

         म्हणूनच, “जसं विचाराल, तसं घडेल” हे वाक्य केवळ तत्त्वज्ञान नाही, तर मानसशास्त्रीय सत्य आहे. याच विचारशक्तीचे गूढ केंद्र म्हणजे — अर्धजागृत मन (Subconscious Mind).

    2. मनाचे चार मुख्य विभाग आणि त्यांच्या अवस्था:

    शास्त्रज्ञांच्या मते, आपल्या मनाचे चार महत्त्वाचे स्तर आहेत, ज्यांच्यामुळे आपल्या जीवनातील अनुभव ठरतात:

 1.चेतन मन (Conscious Mind):

ही आपली ‘जागृत अवस्था’ आहे. तर्क करणे, निर्णय घेणे ही कामे हे मन करते.

२. अर्ध (अव) चेतन मन (Subconscious Mind):

ही ‘ध्यानावस्था’ आहे. येथे आपल्या सर्व सवयी आणि आठवणी साठवलेल्या असतात.

३. अचेतन मन (Unconscious Mind):

 ही ‘स्वप्नावस्था’ आहे.

४. अतिचेतन मन (Super Conscious Mind):

ही ‘गहन निद्रा’ किंवा उच्च अध्यात्मिक अवस्था आहे.

    3. मनाचे विज्ञान: विद्युत कंपने (EEG) चा वैज्ञानिक आधार आणि त्यांचे महत्त्व:

     आपले मन जेव्हा विचार करते, तेव्हा मेंदूमध्ये विद्युत तरंग (Waves) निर्माण होतात. या तरंग गतीनुसार आपल्या मनाची स्थिती ठरते:
  हे तरंग EEG (Electroencephalogram) या वैज्ञानिक उपकरणाद्वारे मोजले जातात. EEG द्वारे मेंदूतील विविध मानसिक अवस्था स्पष्टपणे ओळखता येतात.

  3.1. मनाच्या अवस्था आणि वैज्ञानिक मोजमाप:

मनाची अवस्था विद्युत लहरी (Waves) कंपन प्रमाण (Frequency) मुख्य वैशिष्ट्ये (State) प्रतिमा / चिन्ह (Images)
जागृत अवस्था बीटा (Beta) 20 ते 40 Hz दैनंदिन कामे, तर्क, विश्लेषण आणि बाह्य जगाचे भान.  कामातील व्यक्ती
ध्यानावस्था अल्फा (Alpha) 7 ते 14 Hz शांतता, सर्जनशीलता, अंतर्मनाला सूचना देण्यासाठी सर्वोत्तम वेळ. ध्यानाला बसलेल्या व्यक्ती
स्वप्नावस्था थिटा (Theta) 4 ते 7 Hz गहण विचार, कल्पनाशक्ती आणि झोपेतील स्वप्नांचा काळ. झोपलेल्या/स्वप्न पाहणाऱ्या
निद्रावस्था डेल्टा (Delta) 0 ते 4 Hz गाढ झोप, शरीराची नैसर्गिक दुरुस्ती आणि पूर्ण विश्रांती.

शांत झोप

  3.2. महत्त्वाची गोष्ट:

  जागृत मन Alpha अवस्थेत असताना अर्धजागृत मनाशी थेट संवाद साधू शकते.

     हेच ध्यानाचे खरे शास्त्रीय महत्त्व आहे.

   4. बाह्य मन आणि अंतर्मन यातील फरक:

         मनाचे कार्य समजून घ्यायचे असेल, तर एक सुंदर उदाहरण पाहूया.

 बाह्य मन (Conscious Mind) → नदीतील खळखळते पाणी

 अंतर्मन (Subconscious Mind) → नदीतील शांत, खोल पाणी

   विचारांची ताकद : एक साधं पण प्रभावी उदाहरण:

     फक्त लोणचं किंवा चिंच यांचा विचार केला तरी तोंडाला पाणी सुटतं — हे कसं?

    कारण अर्धजागृत मन:

 खरं–खोटं ओळखत नाही, आपण दाखवलेलं दृश्य सत्य मानतं आणि त्यानुसार शरीरात बदल घडवून आणतं

म्हणूनच,    विचार → प्रतिमा → भावना → शरीर → वास्तव

     हा प्रवास सतत घडत असतो.

4.1. चेतन मन (Conscious) विरुद्ध अर्धजागृत मन (Subconscious): Summary:

तुलनेचा मुद्दा चेतन मन (Conscious Mind) अर्धजागृत मन (Subconscious Mind) क्षमता आणि प्रभाव प्रतिमा / चिन्ह (Images)
भूमिका हा शरीराचा ‘कॅप्टन’ आहे जो दिशा ठरवतो. हे जहाजाचे ‘इंजिन’ आहे जे काम पूर्ण करते. इंजिनशिवाय दिशा व्यर्थ आहे.  कॅप्टन आणि इंजिन
कार्यक्षमता केवळ १०% क्षमता. प्रचंड ९०% क्षमता. अफाट शक्तीचे केंद्र.  हिमनग (Iceberg)
तर्कशास्त्र तर्क करते, विचार करते, निर्णय घेते. तर्क करत नाही; मिळालेली आज्ञा निमूटपणे पाळते. आज्ञाधारक सेवक.  मेंदू/तर्काचे चिन्ह
कार्यकाळ फक्त आपण जागे असताना कार्यरत असते. २४ तास, ७ दिवस सतत कार्यरत असते. कधीही न झोपणारे मन.  घड्याळ
स्मृती (Memory) अल्पकाळाची स्मृती (Short-term). दीर्घकाळाची स्मृती आणि संस्कार (Long-term). आयुष्याचा डेटाबेस. हार्ड डिस्क/संग्रह
नियंत्रण बाह्य जग आणि इंद्रियांवर नियंत्रण. हृदयाचे ठोके, श्वास आणि अनैच्छिक क्रियांचे नियंत्रण. शरीराचा ऑपरेटर.

श्वासाचे चित्र

4.1. अभ्यासासाठी महत्त्वाची नोंद:

  Subconscious Mind वर काम केल्याशिवाय दीर्घकालीन यश शक्य नाही, कारण:

    सवयी तिथेच साठतात, भीती तिथेच रुजते

 आत्मविश्वासही तिथेच निर्माण होतो

  4.2. महत्त्वाची टीप:

    जागृत मन हे ‘कॅप्टन’ आहे आणि अर्धजागृत मन हे जहाजाचे ‘इंजिन’ आहे. कॅप्टनने दिलेली प्रत्येक आज्ञा इंजिन निमूटपणे पाळते.

   5. यशस्वी लोक आणि अर्धजागृत मन:

    बहुतेक लोक:

 जागृत मनावरच जगतात, तर्क करतात, पण अंतर्मन वापरत नाहीत

मात्र, काही लोक:

 अर्धजागृत मनाचा प्रभावी वापर करतात, म्हणूनच ते असामान्य यश मिळवतात

उदा.

संत ज्ञानेश्वर, स्वामी विवेकानंद, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम, सचिन तेंडुलकर, कर्मवीर भाऊराव पाटील

   6. निष्कर्ष:

   थोडक्यात सांगायचं झालं तर:

 आपले जीवन आपल्या विचारांनी घडते

 विचारांची खरी शक्ती अर्धजागृत मनात असते

 ध्यान ही त्या शक्तीपर्यंत पोहोचण्याची किल्ली आहे

 Part 2 मध्ये आपण पाहणार आहोत:

 “अर्धजागृत मन उपयोगात आणण्यासाठीची वैज्ञानिक व्यावहारिक पावले

7. Video support:

हे व्हिडिओ नक्की पहा  (Reference Video)

  • Part 1 https://youtu.be/olL3jRaj9LA 

ऊर्जेचे नियम, एंट्रोपी आणि अभ्यास : शांत व यशस्वी जीवनाचा वैज्ञानिक मार्ग

“ऊर्जेचे नियम, एंट्रोपी आणि अभ्यास : शांत व यशस्वी जीवनाचा वैज्ञानिक मार्ग”

शांत, सुखी व समृद्ध जीवन जगण्यासाठी ऊर्जेचे नियम हुशारीने वापरण्याचे मूलमंत्र.

 

Author:
Prof. Kali C. S.
M.Sc., M.Ed., D.C.S.
50+ Years of Experience in Physics Teaching

1. प्रस्तावना:

     भौतिकशास्त्रातील ऊर्जेचे नियम केवळ प्रयोगशाळा किंवा पाठ्यपुस्तकांपुरते मर्यादित नसून, ते आपल्या दैनंदिन जीवनात सतत कार्यरत असतात. शरीर, मन, भावना आणि विचार — या सर्व पातळ्यांवर ऊर्जेची देवाणघेवाण सुरू असते. ही ऊर्जा योग्य रीतीने वापरली गेली तर जीवन शांत, सुखी व समृद्ध होते; अन्यथा अव्यवस्था, तणाव आणि अस्थिरता वाढते.

  1.1. ऊर्जेचे नियम आणि दैनंदिन जीवन:

   भौतिकशास्त्र सांगते की ऊर्जा एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात रूपांतरित होते. संपूर्ण विश्वात घडणाऱ्या सर्व क्रिया — शारीरिक हालचाली, मेंदूतील विचारप्रक्रिया, भावनिक प्रतिक्रिया — या ऊर्जेच्या हस्तांतरणातूनच घडतात.

    मानवी शरीर व मन ही open systems आहेत. म्हणजेच, ती बाह्य वातावरणाशी सतत ऊर्जा घेत-देऊन व्यवहार करीत असतात. त्यामुळे ऊर्जेचे योग्य व्यवस्थापन हे जीवनातील अत्यंत महत्त्वाचे कौशल्य ठरते.

2. एंट्रोपी (Entropy) : अव्यवस्थेचा नियम:

    Thermodynamics चा दुसरा नियम सांगतो की, कोणत्याही बंद प्रणालीमध्ये कालांतराने एंट्रोपी वाढत जाते. एंट्रोपी म्हणजे अव्यवस्था, गोंधळ किंवा असंतुलन यांचे प्रमाण.

2.1. अव्यवस्था, गोंधळ किंवा असंतुलन:

   साध्या भाषेत सांगायचे तर — वेळ जसजशी पुढे जाते, तसतशी व्यवस्था टिकवणे अधिक कठीण होत जाते.

  हे आपण रोज अनुभवतो:

  घर स्वच्छ ठेवले नाही तर ते आपोआप अस्वच्छ होते

    शेतीची काळजी घेतली नाही तर ती ओसाड होते

 शरीराकडे दुर्लक्ष केले तर आजार वाढतात

विज्ञान स्पष्ट सांगते — कोणतीही व्यवस्था सतत ऊर्जा दिल्याशिवाय टिकू शकत नाही.

2.2. मानवी शरीर, वार्धक्य आणि एंट्रोपी:

      मानवी शरीर ही एक अत्यंत सूक्ष्म व अद्भुत रचना आहे. पण काळ जसजसा पुढे जातो, तसतशी शरीरातील सुव्यवस्था कमी होत जाते. पेशींची झीज होते, संतुलन ढासळते आणि शेवटी वार्धक्य व मृत्यू येतो.

      हे अव्यवस्थेच्या नियमाचे नैसर्गिक फलित आहे. मात्र, विज्ञान हेही सांगते की ऊर्जा कधीही नष्ट होत नाही; ती केवळ रूप बदलते. अध्यात्माच्या भाषेत सांगायचे तर — चेतनाही नष्ट होत नाही, ती परिवर्तन पावते.

2.3. एंट्रोपीचा स्वीकार आणि जीवननियोजन:

    एंट्रोपी म्हणजे निराशा नव्हे, तर वास्तवाची जाणीव आहे. अव्यवस्था वाढणारच आहे, हे समजल्यावर आपण तिच्याशी लढण्याऐवजी नियोजन करू शकतो.

    व्यवसाय, संस्था किंवा स्वतःचे जीवन असो — शिस्त, सातत्य आणि सजगता नसतील तर ऊर्जा वाया जाते आणि गोंधळ वाढतो. म्हणूनच एंट्रोपीला मानसिक मॉडेल म्हणून समजून घेणे उपयुक्त ठरते.

2.4. अभ्यास, मेंदू आणि ऊर्जेचे व्यवस्थापन:

    अभ्यास ही मेंदूसाठी अत्यंत ऊर्जाखाऊ प्रक्रिया आहे. विचार करणे, समजून घेणे, लक्ष केंद्रित करणे — या सर्वांसाठी मोठ्या प्रमाणावर मानसिक ऊर्जा लागते.

    परंतु बहुतेक वेळा आपण दिवसभर अनावश्यक हालचाली, चिंता, सोशल मीडिया, भावनिक अस्थिरता यामध्ये ही ऊर्जा खर्च करून टाकतो. परिणामी संध्याकाळी किंवा रात्री अभ्यास करताना आवश्यक ऊर्जा उपलब्ध राहत नाही.

 एंट्रोपी आणि अभ्यासातील अडचणी

  मानसिक पातळीवरही एंट्रोपी कार्यरत असते. विचारांचा गोंधळ, लक्ष विचलित होणे, आळस — ही मानसिक अव्यवस्थेचीच लक्षणे आहेत.

म्हणूनच अभ्यासासाठी केवळ वेळ नव्हे, तर ऊर्जेचे योग्य व्यवस्थापन आवश्यक आहे.

2.5. ध्यान : ऊर्जा साठवण्याची प्रभावी पद्धत:

   ध्यान ही अशी प्रक्रिया आहे ज्यामुळे मानसिक एंट्रोपी कमी होते. अनावश्यक विचार थांबतात, मन शांत होते आणि मेंदूची ऊर्जा साठवली जाते.

 साधी ध्यानपद्धती:

  1. शांत व आरामदायी ठिकाणी सरळ बसा
  2. शरीर सैल ठेवा, डोळे बंद करा
  3. दोन-तीन वेळा खोल श्वास घ्या व हळूहळू सोडा
  4. श्वासाच्या लयीवर लक्ष केंद्रित करा
  5. किमान 10 मिनिटे या अवस्थेत रहा

या सरावामुळे मनातील गोंधळ कमी होतो आणि अभ्यासासाठी आवश्यक मानसिक ऊर्जा उपलब्ध होते.

सुरुवातीला योग्य प्रशिक्षित मार्गदर्शकाकडून ध्यानाचे प्रशिक्षण घेणे उपयुक्त ठरते.

3. अभ्यासासाठी ऊर्जेचे मूलमंत्र:

  1. दिवसभर अनावश्यक ऊर्जा खर्च टाळा

   2. अभ्यासाची वेळ ऊर्जायुक्त काळात ठरवा

    3. मानसिक शिस्त जोपासा

    4. ध्यानाद्वारे ऊर्जा साठवा

4. निष्कर्ष:

    ऊर्जेचे नियम आणि एंट्रोपी ही संकल्पना आपल्याला एक महत्त्वाचा धडा देतात — व्यवस्था टिकवायची असेल, तर सजग प्रयत्न आवश्यक आहेत.

    अभ्यास असो किंवा जीवन, योग्य ऊर्जाव्यवस्थापन, शिस्त आणि ध्यान यांच्या साहाय्याने आपण मानसिक अव्यवस्था कमी करू शकतो आणि शांत, सुखी व समृद्ध जीवनाच्या दिशेने वाटचाल करू शकतो.

“एंट्रॉपीचा नियम अधिक स्पष्टपणे समजून घेण्यासाठी खालील व्हिडिओ उपयुक्त ठरेल.”

माझ्या आयुष्याला परीसस्पर्श करणारे माझे शिक्षक आदरणीय खट्टे गुरुजी

“माझ्या आयुष्याला परीसस्पर्श करणारे माझे शिक्षक

आदरणीय खट्टे गुरुजी”

 

Author:
Prof. Kali C. S.
M.Sc., M.Ed., D.C.S.
50+ Years of Experience in Physics Teaching

1.गुरु-शिष्य परंपरेचे शाश्वत महत्त्व:

     विद्यार्थ्यांनी स्वतःच्या सर्वांगीण कल्याणासाठी गुरूंवर श्रद्धा ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. त्याचबरोबर स्वतःवरही अढळ आत्मश्रद्धा असली पाहिजे. कारण आत्मश्रद्धा असणाऱ्यालाच खरी विद्या प्राप्त होते. गुरुभक्तीमुळे ज्ञानशक्ती अधिक प्रगल्भ होते. भारतीय संस्कृतीमध्ये गुरु-शिष्य संवादाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

2. गुरुभक्ती आणि आत्मश्रद्धेचा संस्कार:

साने गुरुजींच्या मते, गुरुभक्ती म्हणजे अत्यंत मधुर असे काव्य आहे.

“पुढे स्नेह पाझरे, मागे चालती अक्षरे;

 शब्दापाठी अवतरे, कृपा आधी.”

   याचा अर्थ असा की, प्रथम प्रेम व कृपा प्रकट होते आणि त्यानंतर शब्द व ज्ञान प्रवाहित होते. बौद्धिक विकासासाठी ग्रंथांची मदत होऊ शकते; परंतु आत्मिक उन्नतीसाठी गुरुभक्तीची नितांत आवश्यकता असते. गुरूच्या ठिकाणी असणाऱ्या सद्गुणांचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे मैंदर्गी येथील माझे आदरणीय गुरु श्री अप्पाराव खट्टे गुरुजी होत.

3. मैंदर्गीतील शाळा आणि घडणारे आयुष्य:

    जसा एखादा शिल्पकार कठीण दगडातून सुंदर मूर्ती घडवतो, त्याचप्रमाणे माझ्या जीवनाला योग्य आकार देण्याचे कार्य खट्टे गुरुजींनी केले. सन १९६१–६२ मध्ये मी मैंदर्गी येथे इयत्ता पाचवीत शिकत होतो. त्या वेळी खट्टे गुरुजी माझे वर्गशिक्षक होते. पुढे सहावीत असताना माझ्या शाळेतील गैरहजेरीचे प्रमाण वाढले, कारण मी हॉटेलमध्ये काम करत होतो. सन १९६३–६४ मध्ये सातवीतही हीच परिस्थिती होती.

4. आर्थिक संघर्ष आणि शिक्षणातील खंड:

 सुमारे सहा महिने मी शाळेत गेलो नव्हतो. त्याच काळात सातवीची बोर्ड परीक्षा होती. माझा अनियमितपणा खट्टे गुरुजींच्या लक्षात आला. ते आमच्या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय थळंगे गुरुजी यांच्यासह माझ्या घरी आले. त्या दोघांनी माझ्या वडिलांना सातवीच्या बोर्डाचा फॉर्म भरण्याची कळकळीने विनंती केली. तो प्रसंग आजही माझ्या डोळ्यांसमोर जिवंत उभा राहतो.

   त्या वेळी आमच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. फॉर्म फी भरणे आमच्यासाठी अशक्य होते. हे ओळखून खट्टे गुरुजींनी स्वतः माझी फॉर्म फी भरली. त्यानंतर मी दोन-तीन महिने नियमितपणे शाळेत जाऊ लागलो. मन लावून अभ्यास केला.

 5. सातवीच्या परीक्षेपूर्वीचा निर्णायक क्षण:

  सातवीच्या बोर्डाच्या परीक्षेत मला ६४ टक्के गुण मिळाले. पुढे हॉटेलमध्ये काम करत करतच मी एस.एस.सी. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. एस.एस.सी. परीक्षेत ६८ टक्के गुण मिळवून मी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालो. त्यामुळे मला सोलापूर येथील श्री सिद्धेश्वर बोर्डिंगमध्ये प्रवेश मिळाला. तेथे राहण्याची व जेवणाची मोफत सोय झाली. त्या क्षणापासून मी मागे वळून पाहिले नाही.

 6. प्राध्यापकपदापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास:

 खट्टे गुरुजींनी दाखविलेल्या दिशेने मी सातत्याने वाटचाल करत राहिलो. माझ्या शिक्षणाचा प्रवास M.Sc., M.Ed., D.C.S. पर्यंत पोहोचला. रयत शिक्षण संस्थेच्या सातारा येथील कर्मवीर भाऊराव पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात मी भौतिकशास्त्र विषयाचा सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत होतो. सन २०११ मध्ये निवृत्त झाल्यानंतर ज्ञानश्री इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी येथे शैक्षणिक अधिष्ठाता म्हणून काम केले. सध्या डिजिटल युगात ब्लॉग व यूट्यूब माध्यमातून विविध विषयांवर मार्गदर्शन करत आहे.

 7. एक शिक्षक – अनेक आयुष्यांचे शिल्पकार:

    इयत्ता सातवीत खट्टे गुरुजींनी केलेले मार्गदर्शन हेच माझ्या आयुष्यातील निर्णायक वळण ठरले. त्यांनी त्या वेळी माझा फॉर्म भरला नसता, तर कदाचित मी आजही गावाकडे हॉटेलमध्ये काम करत राहिलो असतो. माझ्या आजवरच्या सर्व यशाचे श्रेय मी खट्टे गुरुजींनाच देतो.

     खट्टे गुरुजी अत्यंत शिस्तप्रिय, बुद्धिमान व विद्यार्थीप्रिय आहेत. त्यांना सामाजिक कार्याची विशेष आवड आहे. अशा थोर गुरूकडून माझ्या अंतःकरणातील सुप्त दिव्यशक्ती जागृत झाली.  त्यांच्या ऋणात राहणे हेच मी माझे भाग्य समजतो.

 

यशाचे शिखर पादाक्रांत करायचे असेल तर ठेवा सकारात्मक दृष्टिकोन

यशाचे शिखर पादाक्रांत करायचे असेल तर ठेवा सकारात्मक दृष्टिकोन

 

  Author:
Prof. Kali C. S.
M.Sc., M.Ed., D.C.S.
50+ Years of Experience in Physics Teaching

1. प्रस्तावना: दृष्टिकोनच आयुष्याची दिशा ठरवतो:

   प्रत्येक व्यक्तीकडे जन्मजात बुद्धिमत्ता आणि क्षमता असते. त्याच क्षमतेच्या आधारावर माणूस विचार करतो, कृती करतो आणि आयुष्याला दिशा देतो.
मात्र केवळ बुद्धिमत्ता असून उपयोग होत नाही. तिचा सकारात्मक दृष्टीने वापर केला, तरच यश शक्य होते.

   उलटपक्षी, नकारात्मक विचार सतत मनात राहिले, तर तीच बुद्धिमत्ता बोथट होते. हळूहळू आत्मविश्वास कमी होतो आणि प्रगती थांबते.
हेच सत्य पुढील सोप्या उदाहरणांमधून अधिक स्पष्ट होते.

       2. एकच कृती, पण वेगवेगळे परिणाम: चालण्याची तीन परिस्थिती :

              2.1. सपाट जमिनीवर चालणे सहज शक्य:

   सपाट जमिनीवर काही अंतर चालायला सांगितले, तर बहुतेक लोक ते सहज करू शकतात.
कारण येथे ना भीती असते, ना धोका. परिस्थिती परिचित असल्यामुळे मन निर्धास्त असते.

  2.2. टेबलवर चालणे थोडी खबरदारी, पण आत्मविश्वास कायम:

आता हेच अंतर टेबलावर चालायला सांगितले, तरी अनेकजण ते करतात.
कारण गरज पडल्यास लगेच खाली उतरता येते. त्यामुळे भीती मर्यादित राहते आणि कृती सुरूच राहते.

    2.3. दोन टॉवरदरम्यान पुलावर चालणे — भीती कृती थांबवते:

 

मात्र जर दोन टॉवर्सच्या मधील पुलावर चालायला सांगितले, तर बहुतेक लोक नकार देतात.
इथे जमिन तीच असते आणि चालण्याची क्रियाही तीच असते. तरीही मन ही परिस्थिती धोकादायक मानते.

परिणामी, भीती वाढते आणि कृती थांबते.

 निष्कर्ष असा की कृती बदलत नाही; बदलतो तो फक्त दृष्टिकोन.
मन नकारात्मक झाले, तर व्यक्ती स्वतःच स्वतःचा अडथळा बनते.

    3. मानवी क्षमतेची सीमा मनात वास्तवात नाही:

3.1.सामान्य व्यक्ती आपल्या एकूण क्षमता:

   मानसशास्त्रातील विविध संशोधनांनुसार, सामान्य व्यक्ती आपल्या एकूण क्षमतेचा केवळ 2% ते 5% भागच वापरते.
मेंदूतील अनेक कौशल्ये, शिकण्याची क्षमता, भावनिक सामर्थ्य आणि सर्जनशीलता वापरली न गेल्यामुळे निष्क्रिय राहतात.

 

3.2. संशोधक, वैज्ञानिक किंवा कलाकार:  

    परंतु संशोधक, वैज्ञानिक आणि कलाकार मात्र वेगळा मार्ग निवडतात.
ते सातत्याने सराव करतात, प्रश्न विचारतात आणि जिज्ञासा जिवंत ठेवतात.
म्हणूनच त्यांच्या क्षमतेचा वापर 20–30% पर्यंत पोहोचतो.

 

3.3. लिओनार्डो दा विंची:

   लिओनार्डो दा विंचीने आपली क्षमता असामान्य पातळीवर विकसित केली, अशी एक प्रसिद्ध दंतकथा आहे.
मोजमाप अचूक नसले, तरी एक गोष्ट निश्चित आहे—

मानवी क्षमता अमर्याद आहे; पण तिच्या मर्यादा आपण स्वतः ठरवतो.

   4. मर्यादा बालपणातच तयार होतात:

    ३ ते १३ वर्षे हा मेंदूच्या विकासाचा अत्यंत महत्त्वाचा काळ असतो.
मात्र याच वयात मुलांना वारंवार असे ऐकायला मिळते—

                                                                                     “ते करू नको”,

“तिथे जाऊ नकोस”,

“हे तुला जमणार नाही”.

     सुरुवातीला ही वाक्ये संरक्षणासाठी असतात.
पण हळूहळू ती भीती, संकोच आणि कमीपणा मनात पेरतात.

    परिणामी, तारुण्यातही व्यक्ती धाडस करत नाही.
स्वतःवर विश्वास ठेवण्याऐवजी ती स्वतःलाच मर्यादित मानू लागते.

   5. सकारात्मक दृष्टिकोन म्हणजे उन्नतीची किल्ली:

   यश मिळवायचे असेल, तर स्वतःला वारंवार एकच वाक्य सांगणे आवश्यक आहे—

“मी हे करू शकतो.”

   इतरांचा नकारात्मक सल्ला आंधळेपणाने स्वीकारू नका.
त्याऐवजी विचारपूर्वक निर्णय घ्या.
स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा आणि प्रयत्न सुरू ठेवा.

कारण आत्मविश्वासाशिवाय कोणतेही यश शक्य होत नाही.

   6. बोध कथा:

   

  एका तलावात अनेक बेडूक राहत होते.
उत्सवाच्या दिवशी त्यांनी शर्यत ठेवली.

   जो बेडूक टॉवरच्या माथ्यावर पोहोचेल, तो विजेता!

   काही तरुण बेडूक शर्यतीसाठी पुढे आले.
मात्र प्रेक्षक ओरडू लागले—

“हे अशक्य आहे!”
“तुम्ही कधीच वर पोहोचणार नाही!”

    हे ऐकून एकामागून एक बेडूक शर्यत सोडू लागले.
तरीही एक बेडूक सातत्याने पुढे जात राहिला.

     शेवटी तोच टॉवरच्या शिखरावर पोहोचला आणि विजयी ठरला.इतर बेडूकांना हे जाणून घ्यायचे होते की त्याने शर्यत कशी जिंकली. ते त्याच्याकडे आले आणि त्यांनी त्याला विचारले की त्याचा रहस्य काय आहे. पण तो काहीच उत्तर देत नव्हता.
नंतर सर्वांना कळले की तो विजेता बेडूक बहिरा होता.

 त्याला नकारात्मक आवाज ऐकूच येत नव्हते.

   7. मतितार्थ: यशासाठी योग्य काय?

   आपल्या आयुष्यातही हेच घडते.
नकारात्मक विचार पेरणारे लोक कायम भेटत राहतात.
मात्र त्यांचे शब्द मनात साठवायचे की नाही, हे आपल्यावर अवलंबून असते.

एका कानाने ऐका आणि दुसऱ्या कानाने सोडा.
स्वतःवर विश्वास ठेवा.
स्वप्नांचा पाठपुरावा शेवटपर्यंत करा.

 सकारात्मक विचारांवर जगणारी व्यक्तीच यशाचे शिखर पादाक्रांत करते.

   8. Video support:

खालील विडिओ मध्ये इच्छा तिथे मार्ग या गोष्टीवर भर दिला आहे .

( From You tube)

“ऊर्जेचे नियम, मेंदूची कार्यपद्धती आणि स्मरणशक्ती वाढवण्यासाठी अभ्यासाची वैज्ञानिक पद्धत”

ऊर्जेचे नियम, मेंदूची कार्यपद्धती आणि स्मरणशक्ती वाढवण्यासाठी अभ्यासाची वैज्ञानिक पद्धत

“The laws of energy, the functioning of the brain, and the scientific method of studying to improve memory.”

   

Author:
Prof. Kali C. S.
M.Sc., M.Ed., D.C.S.
50+ Years of Experience in Physics Teaching

1. प्रस्तावना: अभ्यास असूनही आठवत नाही—का? :

   अनेकदा तासन्‌तास अभ्यास करतो. तरीसुद्धा परीक्षेच्या वेळी अनेक विद्यार्थ्यांना एकच प्रश्न सतावतो—

“मी इतकं वाचलं, तरी आठवत का नाही?”

     त्याच वेळी, काही विद्यार्थी कमी वेळ अभ्यास करूनही सातत्याने उत्तम यश मिळवतात. म्हणूनच प्रश्न अभ्यासाच्या वेळेचा नसून अभ्यासाच्या पद्धतीचा आहे.

खरं तर, अभ्यास जास्त करण्यापेक्षा तो योग्य पद्धतीने करणं अधिक महत्त्वाचं आहे.

    या लेखामध्ये आपण ऊर्जेचे नियम, मेंदूची कार्यशैली, योगशास्त्र आणि स्मृतीविज्ञान यांच्या आधारे अभ्यास अधिक प्रभावी कसा करता येईल हे सोप्या भाषेत समजून घेणार आहोत.

2. मेंदूचा वापर —गैरसमज आणि वास्तव:

     सर्वप्रथम, मेंदूबाबतचा एक मोठा गैरसमज दूर करणं आवश्यक आहे.

    सामान्यतः असं म्हटलं जातं की काही लोक मेंदूचा जास्त वापर करतात, तर काही कमी. प्रत्यक्षात मात्र, मानव मेंदू 100% कार्यरत असतो.

   फरक इतकाच असतो की वेगवेगळ्या वेळी मेंदूचे वेगवेगळे भाग अधिक सक्रिय होत असतात.

   म्हणूनच, प्रश्न मेंदू किती वापरतो हा नसून मेंदू योग्य वेळी योग्य प्रकारे वापरतो का? हा आहे.

3. डावा आणि उजवा मेंदू — काम करण्याची दोन शैली (विचारांची दोन बाजू ):

 

  3.1.  मेंदूची रचना थोडक्यात: 

     मानव मेंदूचे दोन मुख्य भाग असतात—

डावा मेंदू आणि उजवा मेंदू.

 डावा मेंदू → उजव्या शरीरावर नियंत्रण

 उजवा मेंदू → डाव्या शरीरावर नियंत्रण

याशिवाय, नाकपुडी आणि मेंदू यांच्यातही सूक्ष्म संबंध आहे.

जेव्हा डावी नाकपुडी सक्रिय असते तेव्हा उजवा मेंदू सक्रिय असतो आणि उलट. 

 3.2. डावा मेंदू :

 1. Logical गणित

2.भाषा

3. विश्लेषण 

4.नियम व तर्क

    मेंदूच्या डाव्या भागात भाषा, विचार, गणित, तर्क यांची केंद्रे आहेत. धोरण ठरवण्याचं काम डाव्या मेंदूचे.  हा वस्तुनिष्ठ विचार, एखाद्या गोष्टीच्या खोलात जाऊन विचार करतो. विज्ञानाचे काम या क्षेत्राकडे सोपवलेले आहे. 

 3.3. उजवा मेंदू :

  1.  Creative  कल्पनाशक्ती 

  2.चित्रकला 

  3.संगीत

  4.सर्जनशीलता

       उजव्या भागात भावना, कला, सृजनशीलता यांची केंद्रे आहेत. उजव्या मेंदूला कल्पनाविलास आवडतो, धाडस करणं हे या मेंदूचं काम असतं. चित्र आणि वेगवेगळ्या कला हे उजव्या मेंदूचे महत्वाचे माध्यम आहे.

    दोन्ही भाग सतत एकत्र काम करतात. परंतु काही परिस्थितीत एखादा भाग अधिक सक्रिय असतो.

 अभ्यासात दोन्ही मेंदूंचा समतोल वापर केल्यास परिणाम लक्षणीयरीत्या सुधारतो.

4.नाकपुडीद्वारेश्वास व मेंदूची कार्यशैली (योगिक संकल्पना):

4.1 प्रबळ नाकपुडीचा सिद्धांत:

योगशास्त्रानुसार, आपण नेहमी एका प्रबळ नाकपुडीने श्वास घेत असतो.

साधारणतः प्रत्येक 2 ते 2.5 तासांनी ही प्रबळ नाकपुडी बदलते.

4.2 नाकपुडी आणि मेंदू यांचा संबंध:

 डावी नाकपुडी सक्रिय → उजवा मेंदू सक्रिय

 उजवी नाकपुडी सक्रिय → डावा मेंदू सक्रिय

म्हणजेच, योग्य वेळी योग्य विषय निवडल्यास अभ्यास अधिक सोपा आणि प्रभावी होतो.

4.3 नाकपुडीप्रमाणे विषय निवड:

डावी नाकपुडी सक्रिय असताना:  उजवा मेंदू सक्रिय:

हा वेळ सर्जनशील विषयांसाठी उत्तम: 

1.निबंध 

2.कला 

3.आकृतिबंध 

4.नवीन कल्पना

   जेव्हा आपली उजवी नाकपुडी अधिक स्पष्ट असेल तेव्हा आपल्या मेंदूची डावी बाजू, जी मनाचा शैक्षणिक / तर्कशास्त्र भाग आहे, त्या क्षणी अधिक चांगले कार्य करीत आहे.

  4.4.  उजवी नाकपुडी सक्रिय असेल → डावा मेंदू सक्रिय:

हा वेळ तर्कशुद्ध विषयांसाठी उत्तम: 

1.गणित 

2.सूत्रे 

3.स्पष्टीकरण 

4.समस्या सोडवणे

फक्त नाकपुडी तपासून विषय निवडल्यास अभ्यासाची गुणवत्ता मोठ्या प्रमाणात वाढते.

 4.5. टेस्ट कशी करायची?

श्वास तपासण्याची सोपी पद्धत

  1. शांतपणे सरळ बसा.

  2. उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा.

  3. डाव्या नाकपुडीने श्वास घ्या व सोडा.

    • श्वास सहज येत-जात असेल → डावी नाकपुडी सक्रिय.

  4. आता अंगठा काढा आणि डावी नाकपुडी बंद करून

    • उजव्या नाकपुडीने श्वास घ्या व सोडा.

    • श्वास सहज असेल → उजवी नाकपुडी सक्रिय.

  5. ज्या बाजूने श्वास अधिक मोकळा आहे, ती नाकपुडी सध्या सक्रिय असते.

दोन्ही नाकपुड्यांसमोर हाताचा हलका स्पर्श ठेवा व श्वास कुठून जास्त बाहेर येतो ते पहा.

5.ऊर्जा नियम आणि अभ्यास:

  5.1. उर्जेच्या पहिला नियम: ऊर्जा नष्ट होत नाही:

   भौतिकशास्त्र उर्जेच्या पहिला नियमांनुसार एका प्रकारच्या उर्जे मधून दुसर्‍या प्रकारच्या उर्जे मध्ये हस्तांतरण होते.

     संपूर्ण विश्वामध्ये ऊर्जेची  देवाण घेवाण मधूनच अनेक क्रिया घडत आहेत . हेच आपल्या शरीरावरही लागू होते.  शारीरिक , भावनिक , मानसिक अश्या सर्व पातळीवर सुद्धा ऊर्जेची  देवाण घेवाण मधूनच क्रिया घडत आहेत.

दिवसभरातील ऊर्जा:  विचार, भावना, हालचाल, ताणतणाव, मोबाइल स्क्रीन

या सगळ्यात ऊर्जा खर्च होते.

म्हणूनच, अभ्यासासाठी शांत मन + स्थिर ऊर्जा = उत्तम एकाग्रता हे सूत्र महत्त्वाचे ठरते.

5.2. एंट्रोपीचा नियम आणि मनःस्थिती:

    भौतिकशास्त्र उर्जेच्या दुसऱ्या नियमानुसार,

एन्ट्रॉपी तापमानास प्रमाणित आहे.एंट्रोपी म्हणजे अस्वस्थपणा, अशांतता, गोंधळ यांचे प्रमाण.

 हे सूचित करते की अस्वस्थपणा वाढविण्यासाठी अधिक ऊर्जा वापरली जाते. जास्त अस्वस्थपणा म्हणजे वापरासाठी कमी ऊर्जा उपलब्ध, कमी अस्वस्थपणा म्हणजे वापरासाठी जास्त ऊर्जा उपलब्ध.

  • जास्त अस्वस्थ मन → कमी ऊर्जा → कमी लक्ष → कमी स्मरणशक्ती
  • शांत मन → जास्त ऊर्जा उपलब्ध → चांगला अभ्यास

म्हणून अभ्यासापूर्वी मन शांत करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

6. अभ्यास सुरू करण्यापूर्वी (भाग१):

  1. ५ मिनिटे ध्यान किंवा श्वसन
  2. नाकपुडी तपासून विषय निवडा
  3. एकावेळी एकच विषय
  4. फोन silent / दूर ठेवा
  5. लहान ब्रेक

हे सगळे घटक मिळून अभ्यासाची गुणवत्ता एकदम वाढते.

7. अभ्यास आणि ऊर्जा (भाग–२):

7.1.  सकाळचा अभ्यास सर्वोत्तम का ?

  • रात्रभर शरीर विश्रांती
  • मन शांत
  • नवी ऊर्जा
  • वातावरणात कमी आवाज

7.2. संध्याकाळी अभ्यास कमी productive का ?

  • दिवसभरातील तणाव
  • ऊर्जा कमी
  • थकवा
  • स्क्रीन exposure

म्हणून शक्यतो महत्त्वाचा अभ्यास सकाळी करावा.

7.3. ऊर्जा जतन करण्याचे मार्ग

  • अनावश्यक हालचाली कमी करा
  • मेंदूला विचलित करणारी कामे टाळा
  • ध्यान, 2-minute deep breathing
  • power naps (20 minutes)

8. ध्यान मेंदू स्थिर करण्याचा सर्वात जलद मार्ग:

ध्यान म्हणजे मन रिकामे करणे नाही—तर मन शांत करणे.

सोपे ध्यान (१० मिनिटे):

1.शांत ठिकाणी बसा 

2.डोळे बंद 

3.खोल श्वास घ्या 

4.शरीर सैल करा

  5.फक्त श्वासावर लक्ष ठेवा

मग अभ्यासाची गुणवत्ता दुप्पट होते.

ध्यानाचे महत्व समजण्यासाठी YOUTUBE वरील पुढील व्हिडिओ  पहा .

9.स्मृती (Memory) आणि  विसरणे (Forget)  :वैज्ञानिक वास्तव:

 9.1. स्मृती (Memory):

व्यक्तीला जीवनात आलेले अनुभव, मिळालेली माहिती, ज्ञान यांसारख्या गोष्टी मनात साठवून ठेवण्याची आणि भविष्यात त्या आठवून (त्यांना बाहेर काढून) जाणिवेच्या अवस्थेत त्यांचा पुन्हा अनुभव घेण्याची वा वापर करण्याची क्षमता म्हणजेच स्मृती (Memory ) होय.

9.2. विसरणे (Forget):

     एखाद्या व्यक्तीच्या अल्प किंवा दीर्घकालीन स्मृतीमध्ये आधीच संग्रहित केलेल्या माहिती  गमावणे (To Lose) किंवा बदल (To Change) होणे म्हणजे विसरणे (Forget) (लक्षात न रहाणे). ही एक उत्स्फूर्त तसेच हळूहळू प्रक्रिया आहे ज्यामध्ये स्मृतीमधील माहिती परत आणता येत नाहीत.

     विसरण्याच्या संशोधनातून असे दिसून आले आहे की

1.शिकणारे सरासरी 50% नवीन माहिती एक तासाच्या आत विसरतात.

2.शिकणारे सरासरी 70% नवीन माहिती 24 तासांच्या आत विसरतात.

3.शिकणारे शिकलेले 90% पर्यंत नवीन माहिती एका आठवड्याच्या आत विसरतात.

म्हणूनच, revision आणि visualization अत्यंत आवश्यक आहे.

10.शिकलेले स्मृतीत साठवणे:

     शिकलेले नवीन माहिती स्मृतीत साठवणे ही एखाद्या व्यक्तीची त्यांच्या दीर्घकालीन स्मृतीमध्ये हस्तांतरित करण्याची क्षमता आहे ज्यामुळे त्यांना ते ज्ञान लक्षात ठेवणे आणि भविष्यात वापरण्यासाठी स्मृतीत ठेवणे सोपे होईल.

   संशोधन असे दर्शवितो की लोक लक्षात ठेवतात:

  1. लोक शिकलेले नवीन माहिती10%लक्षात ठेवतात ते जे ऐकतात,
  2. लोक शिकलेले नवीन माहिती 20% लक्षात ठेवतात ते जे वाचतात,
  3. लोक शिकलेले नवीन माहिती 80% लक्षात ठेवतात ते जे पाहतात.

आणि याचे कारण असे की मानवी मेंदू लिखित भाषेपेक्षा दृश्य पुरावांवर अधिक चांगल्या प्रकारे प्रक्रिया करतो.

म्हणून:

  • diagrams
  • flowcharts
  • mind maps
  • रंगीत नोट्स

हे स्मरणशक्ती प्रचंड वाढवतात.

 माहिती टिकवून ठेवण्यासाठी आणि आठवणे आणि स्मरणशक्ती सुधारण्यासाठी पुढील YOUTUBE व्हिडिओ पहा.

                           

11.स्मृतीची क्षमता वाढवण्यासाठी पुढे दिलेल्या काही सोप्या पद्धती :

१. आपण A पासून Z पर्यंत अक्षरे म्हणतो. त्या ऐवजी  Z पासून A पर्यंत अक्षरे म्हणण्याचे सराव करा.

२. आपल्याला आवडलेल्या  गाण्यातील शब्दातील अक्षरे उलट करून गाणे आहे तसे म्हणणे.

३. वाचताना तोंडाने हळू आवाजामध्ये पुटपुटणे. खात्रीने

४. आपण वाचलेली माहिती दुसऱ्याला समजावून सांगणे.

५. ३० पर्यंतचे पाढे पाठ करा.

ही पद्धती सतत वापरल्यास एकाग्रता, ऊर्जा व स्मरणशक्ती तिन्ही गुणांनी वाढते आणि परीक्षेतील यश निश्चित होते.

12.निष्कर्ष:

 तुम्हाला आता वाचलेले लक्षात कसे ठेवावे आणि वाचलेले लक्षात राहण्यासाठी उपाय हे माहित झाले आहेत.

  1. थोडक्यात अभ्यास सुरु करताना प्रथम ध्यानाने सुरु करावी.
  2. नंतर सध्या कोणती नाकपुडी कार्यरत आहे म्हणजेच श्वास घेणे प्रबल आहे हे तपासा व वर सांगितल्या प्रमाणे विषयाची निवड करून अभ्यास करावा.
  3. अभ्यासामध्ये सातत्य ठेवावा.

या वैज्ञानिक पद्धती वापरल्यास ऊर्जा, एकाग्रता आणि स्मरणशक्ती—तिन्ही वाढतात आणि परीक्षेतील यश निश्चित होते.

 आपल्या यशासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

 

 

Marathi Archives - Physics Prana