माझ्या आयुष्याला परीसस्पर्श करणारे माझे शिक्षक आदरणीय खट्टे गुरुजी

माझ्या आयुष्याला परीसस्पर्श करणारे माझे शिक्षक आदरणीय खट्टे गुरुजी

December 25, 2025 | Physics Prana

“माझ्या आयुष्याला परीसस्पर्श करणारे माझे शिक्षक

आदरणीय खट्टे गुरुजी”

 

Author:
Prof. Kali C. S.
M.Sc., M.Ed., D.C.S.
50+ Years of Experience in Physics Teaching

1.गुरु-शिष्य परंपरेचे शाश्वत महत्त्व:

     विद्यार्थ्यांनी स्वतःच्या सर्वांगीण कल्याणासाठी गुरूंवर श्रद्धा ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. त्याचबरोबर स्वतःवरही अढळ आत्मश्रद्धा असली पाहिजे. कारण आत्मश्रद्धा असणाऱ्यालाच खरी विद्या प्राप्त होते. गुरुभक्तीमुळे ज्ञानशक्ती अधिक प्रगल्भ होते. भारतीय संस्कृतीमध्ये गुरु-शिष्य संवादाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

2. गुरुभक्ती आणि आत्मश्रद्धेचा संस्कार:

साने गुरुजींच्या मते, गुरुभक्ती म्हणजे अत्यंत मधुर असे काव्य आहे.

“पुढे स्नेह पाझरे, मागे चालती अक्षरे;

 शब्दापाठी अवतरे, कृपा आधी.”

   याचा अर्थ असा की, प्रथम प्रेम व कृपा प्रकट होते आणि त्यानंतर शब्द व ज्ञान प्रवाहित होते. बौद्धिक विकासासाठी ग्रंथांची मदत होऊ शकते; परंतु आत्मिक उन्नतीसाठी गुरुभक्तीची नितांत आवश्यकता असते. गुरूच्या ठिकाणी असणाऱ्या सद्गुणांचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे मैंदर्गी येथील माझे आदरणीय गुरु श्री अप्पाराव खट्टे गुरुजी होत.

3. मैंदर्गीतील शाळा आणि घडणारे आयुष्य:

    जसा एखादा शिल्पकार कठीण दगडातून सुंदर मूर्ती घडवतो, त्याचप्रमाणे माझ्या जीवनाला योग्य आकार देण्याचे कार्य खट्टे गुरुजींनी केले. सन १९६१–६२ मध्ये मी मैंदर्गी येथे इयत्ता पाचवीत शिकत होतो. त्या वेळी खट्टे गुरुजी माझे वर्गशिक्षक होते. पुढे सहावीत असताना माझ्या शाळेतील गैरहजेरीचे प्रमाण वाढले, कारण मी हॉटेलमध्ये काम करत होतो. सन १९६३–६४ मध्ये सातवीतही हीच परिस्थिती होती.

4. आर्थिक संघर्ष आणि शिक्षणातील खंड:

 सुमारे सहा महिने मी शाळेत गेलो नव्हतो. त्याच काळात सातवीची बोर्ड परीक्षा होती. माझा अनियमितपणा खट्टे गुरुजींच्या लक्षात आला. ते आमच्या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय थळंगे गुरुजी यांच्यासह माझ्या घरी आले. त्या दोघांनी माझ्या वडिलांना सातवीच्या बोर्डाचा फॉर्म भरण्याची कळकळीने विनंती केली. तो प्रसंग आजही माझ्या डोळ्यांसमोर जिवंत उभा राहतो.

   त्या वेळी आमच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. फॉर्म फी भरणे आमच्यासाठी अशक्य होते. हे ओळखून खट्टे गुरुजींनी स्वतः माझी फॉर्म फी भरली. त्यानंतर मी दोन-तीन महिने नियमितपणे शाळेत जाऊ लागलो. मन लावून अभ्यास केला.

 5. सातवीच्या परीक्षेपूर्वीचा निर्णायक क्षण:

  सातवीच्या बोर्डाच्या परीक्षेत मला ६४ टक्के गुण मिळाले. पुढे हॉटेलमध्ये काम करत करतच मी एस.एस.सी. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. एस.एस.सी. परीक्षेत ६८ टक्के गुण मिळवून मी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालो. त्यामुळे मला सोलापूर येथील श्री सिद्धेश्वर बोर्डिंगमध्ये प्रवेश मिळाला. तेथे राहण्याची व जेवणाची मोफत सोय झाली. त्या क्षणापासून मी मागे वळून पाहिले नाही.

 6. प्राध्यापकपदापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास:

 खट्टे गुरुजींनी दाखविलेल्या दिशेने मी सातत्याने वाटचाल करत राहिलो. माझ्या शिक्षणाचा प्रवास M.Sc., M.Ed., D.C.S. पर्यंत पोहोचला. रयत शिक्षण संस्थेच्या सातारा येथील कर्मवीर भाऊराव पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात मी भौतिकशास्त्र विषयाचा सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत होतो. सन २०११ मध्ये निवृत्त झाल्यानंतर ज्ञानश्री इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी येथे शैक्षणिक अधिष्ठाता म्हणून काम केले. सध्या डिजिटल युगात ब्लॉग व यूट्यूब माध्यमातून विविध विषयांवर मार्गदर्शन करत आहे.

 7. एक शिक्षक – अनेक आयुष्यांचे शिल्पकार:

    इयत्ता सातवीत खट्टे गुरुजींनी केलेले मार्गदर्शन हेच माझ्या आयुष्यातील निर्णायक वळण ठरले. त्यांनी त्या वेळी माझा फॉर्म भरला नसता, तर कदाचित मी आजही गावाकडे हॉटेलमध्ये काम करत राहिलो असतो. माझ्या आजवरच्या सर्व यशाचे श्रेय मी खट्टे गुरुजींनाच देतो.

     खट्टे गुरुजी अत्यंत शिस्तप्रिय, बुद्धिमान व विद्यार्थीप्रिय आहेत. त्यांना सामाजिक कार्याची विशेष आवड आहे. अशा थोर गुरूकडून माझ्या अंतःकरणातील सुप्त दिव्यशक्ती जागृत झाली.  त्यांच्या ऋणात राहणे हेच मी माझे भाग्य समजतो.

 

Categories: Marathi, Motivation

Tags: , , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

माझ्या आयुष्याला परीसस्पर्श करणारे माझे शिक्षक आदरणीय खट्टे गुरुजी - Physics Prana